चिपळूण – चिपळूण शहरालगतच्या खेर्डी येथील बांग्लादेशी लोकांना काही दिवसांपूर्वी पकडल्याची घटना ताजी असताना आता सावर्डे येथे दोन बांग्लादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्याही कागदपत्राशिवाय ते बांग्लादेशातून भारतात आल्याचे पोलिस तपासात पुढे येत असून अधिक तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.
ही घटना आज ७ नोव्हेंबर रोजी समोर आली. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश गुरव यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मुश्ताक शेख महंमद अतिआर शेख (३७), तसेच मोहम्मद शाहीद गाझी (२३) या बांग्लादेशींना सावर्डे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३० हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मोबाईल, हिरोहोंडा गाडी जप्त करण्यात आली आहे. हे दोन तरूण बांग्लादेश ते भारत कोणत्याही कागदपत्राशिवाय भारत-बांग्लादेश सीमेवरून मुलखी अधिकाराच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात आले व भारतात अवैधरित्या प्रवेश करून सावर्डे येथे वास्तव्यास राहिले. भारतात प्रवेश नियम 1950 चा नियम 3 सह 6, परकीय नागरिक आदेश 1948 आणि परकीय नागरिक कायदा 1946च्या अन्वये या दोघांना अटक झाली आहे.
चिपळूण शहरातील काही बिल्डिंग बांधकामावर सुद्धा बांगलादेशी नागरिक काम करत असल्याची चर्चा सध्या चिपळूण शहरात सुरू आहे. याबाबत सुद्धा दहशतवादी विरोधी पथक आणि चिपळूण पोलिसांनी पाहणी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.