गुहागर – गुहागर तालुक्यातील गिमवी मधील दुर्गम अशा कातकरी-आदिवासी वस्तीवर डोंगर-दऱ्यांतून सुमारे ३ कि.मी.अंतर चालून जिल्हाधिकारी एम. देवेंदर.सिंह यांनी भेट दिली.साक्षात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या पहील्याच भेटीने आदिवासी वस्तीने मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले.
सध्या जिल्ह्यात महसूल सप्ताह १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे.याच सप्ताहाच्या अनुषंगाने जनसंवाद या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एम. देवेंदर.सिंह यांनी गुहागर तालुक्यातील गिमवी या गावच्या दुर्गम अशा कातकरी-आदिवासी वस्तीवर जावून तेथील कातकरी – आदिवासी बांधवांशी दिलखुलास संवाद साधला. दुर्गम व आदिवासी वस्तीवरील एक अविस्मरणीय अनुभव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधला.जनतेच्या समस्या,मुलभूत गरजा जाणून घेतल्या. रेशनकार्ड,जमिनीचा ७/१२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले,उत्पन्नाचे दाखले आदी महत्त्वाचे शासकीय दस्तऐवजांचे वितरण यावेळी करण्यात आले. या आदिवासी वाडीतील गुणवंत व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे , आरोग्य अधिकारी डॉक्टर जांगिड, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, त्यासह महसूलचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे देवघरच्या सरपंच वैभवी जाधव, उपसरपंच महेंद्र गावडे प्रसाद सोमण, विजय जाधव, नितीन जाधव, डॉक्टर संदीप जाधव यांच्यासह गिमवी मधील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते