लांजा – पत्नीवर कोयत्याने वार करत आपल्या सहा वर्षीय बाळाचा देखील बळी घेत दोघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे घडली आहे. या घटनेनंतर सैतानाला लाजवेल असे कृत्य करणारा तरुण घटनेनंतर बेपत्ता झाला असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारक हत्याकांडाने लांजा तालुका हादरून गेला आहे. मात्र या हत्याकांडाचे कारण स्पष्ट झालेले नाही याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथील रहिवासी असलेला संदेश रघुनाथ चांदवडे हा आपली आई आशा चांदवडे, पत्नी सोनाली चांदवडे मुलगा प्रणव चांदवडे आणि दुसरा मुलगा पियुष चांदवडे यांच्यासह राहत होता. संदेश चांदवडे हा आपल्या मामाच्या घरात म्हणजेच प्रकाश शांताराम पाष्टे यांच्या घरात राहत होता. पाष्टे यांचे सर्व कुटुंब हे मुंबईत राहतात तर संदेश चांदवडेकर हा आपली पत्नी आई आणि मुलांसह मामाच्या घरात कोट पाष्टेवाडी येथे राहतो. सोनाली चांदवडे हिचे माहेर सांगली येथील आहे.
संदेश चांदवडे हा वीज मीटर रिडींग आणि बिले देण्याचे काम करत असे. पत्नी आणि दोन मुलांसह त्याचा सुखाचा संसार सुरू होता. तो स्वभावाने शांत होता. कुठल्याही प्रकारचे त्याला व्यसन देखील नव्हते, असे शेजारी पाजाऱ्यांकडून सांगण्यात आले. आजूबाजूच्या लोकांशी देखील त्याचे फारसे येणे जाणे नसायचे.पत्नी सोनाली बरोबर झालेल्या वादातून आज पहाटेच्या सुमारास संदेश याने आपल्या सहा वर्षीय बालक प्रणव याचा बळी घेतला. तर पत्नी सोनाली हिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये दोघेही जागीच गतप्राण झाली. ही घटना घराच्या पाठीमागे घडली. या घटनेनंतर संदेश याने पलायन केले.
बुधवारी रात्री संदेश चांदवडे हा पत्नी व सहा वर्षीय मुलगा प्रणव हे एकत्र झोपले होते. तर ३ वर्षीय पियुष आजी आशा हिच्यासोबत दुसऱ्या खोलीत झोपले होते. त्यामुळे या हत्याकांडाच्या घटनेत तो बचावला. मात्र आई व भावाच्या मायेला पोरका झाला आहे.पहाटे साडेसहा वाजण्याच्या दरम्यान संदेश याची आई आशा उठल्या असता त्यांना घरात संदेश व सुन सोनाली न दिसल्याने हाका मारत घराच्या पाठीमागे गेली असता सोनाली ही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली. सून सोनालीचा मृतदेह पाहिला आणि तीने हंबरडा फोडला. तिच्या जोरजोरात रडण्याने शेजारीपाजारी जमा झाले. घरालगत असलेले विजय पाष्टे आणि संतोष राजये हे प्रथम तिच्या घरी गेले. त्यांनी घटनेची माहिती पोलीस पाटील यांना कळवण्यात आली आणि त्यानंतर लांजा पोलिसांना या हत्याकांडाची माहिती देण्यात आली.