गुहागर ; २५ वर्षानंतर ते दांपत्य चढले पुन्हा बोहल्यावर

0
556
बातम्या शेअर करा

गुहागर – चिपळूण तालुक्यातील भिले गावातील मुळचे व आता सि वुडस्,नवी मुंबई येथे वास्तव्यास असणारे दिनेश लहू दिवेकर आणि सौ देविका दिनेश दिवेकर यांनी आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस गुहागर तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणुन विकसित होत असलेल्या गुहागर तालुक्यातील तवसाळ या निसर्गरम्य ठिकाणी आपली आत्या नंदिनी मिशाळ यांच्या निवासस्थानी पुन्हा बोहल्यावर चढत मोठ्या उत्साहात, दिमाखदार पद्धतीने साजरा केला.

२५ वर्षांपूर्वी १९९७ साली मुळचे चिपळूण तालुक्यातील दाभोळ खाडी मधील भिले गावचे रहिवासी असणारे आणि मुंबई मजगाव डॉक मध्ये नोकरी करणारे लहू विठोबा दिवेकर यांचे मंत्रालयात होम डिपार्टमेंट मध्ये नोकरी करणारे ज्येष्ठ चिरंजीव दिनेश यांचा विवाह दाभोळ खाडी परिसरातीलच मात्र खेड तालुक्यातील कोतोली गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ शांताराम जाधव यांची कन्या जयश्री हिच्या बरोबर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. जाधव आणि दिवेकर हे दाभोळ खाडीतील भोई समाजातील घरंदाज आणि संस्कारी घराणे यामुळे दिनेश आणि देविका यांचा संसारही या संस्कारांमुळे बहरत गेला. या संसार वेलीला आलेली दोन संस्कारी फुले म्हणजेच दिनेश दिवेकर यांचा ज्येष्ठ चिरंजीव राज मर्चंट नेव्हीचे शिक्षण घेत आहे तर कनिष्ठ कन्या दक्षता हिनेही सायन्समधुन पदवी प्राप्त केली आहे. संसाराचा गाडा ओढत असताना आणि मुलांचे शिक्षण होत असताना या सुखी संसाराची २५ वर्ष कधी पुर्ण झाली हे दिवेकर कुटुंबाला कळलच नाही. सोशल मीडियाच्या युगात लग्नाचे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होत असताना दिनेश दिवेकर यांची आई, भावंडे आणि मुले यांनी दिनेश आणि देविका यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करायचा ठरवला आणि त्याला साथ दिली ती त्यांची आत्या सौ नंदिनी नंदकुमार मिशाळ यांनी आणि मग ठरलं आत्याच्या गावी म्हणजे गुहागर तालुक्यातील निसर्गरम्य अशा तवसाळ गावी दिनेश आणि देविका या दोघांनाही पुन्हा त्याच रीती-रीवाजाप्रमाणे लग्नाच्या बोहल्यावर चढवायचं आणि त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस करायचा. या नियोजनाप्रमाणे तवसाळमधील नंदकुमार मिशाळ यांचं घर गजबजुनच गेलं होत. ३१ डिसेंबर २०२२ रोजी ज्याप्रमाणे एखाद्या नव्या लग्नाची लगबग असते त्याप्रमाणेच मिशाळांच्या घरी सनई चौघडा वाजु लागला. पाहुण्यांची वर्दळ सुरु झाली. नंदिनी वहिनींच्या आग्रहामुळे तवसाळ गावातील शेजारीपाजारी महिला – पुरुष सुद्धा मोठ्या आनंदाने या सोहळ्या सहभागी झाले.

देविका वहिनी आणि दिनेश यांना २५ वर्षानंतर पुन्हा एकदा हळद लागली. हळद लागल्यानंतर हळद लागलेले नवरा नवरी स्थानिक मंदिरात जाऊन आले. आणि संध्याकाळी रंगला तो पुनश्च विवाहाचा कार्यक्रम. २५ वर्षानंतर सुद्धा नवरा नवरीचा तोच नटखटपणा, लाजाळुपणा, करवल्यांची धमाल, व-हाड्यांची मस्ती, मंगलाष्टकांचे मंगल,मंजुळ सुर आणि पुन्हा एकदा शुभमंगल सावधान चा जयघोष. आई-वडिलांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करत असताना आई-वडिलांना बोहल्यावर चढवुन, आंतरपाट धरून, मंगलाष्टका म्हणुन अक्षता त्यांच्या डोक्यावर टाकताना मुलगा राज आणि मुलगी दक्षता यांची लगबग तर पाहण्यासारखीच होती. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ठरवुन लग्न होणे ते टिकवणे, बहरनणे,पुर्णत्वास जाणे हि तारेवरची कसरत असतानाच दिनेश आणि देविका यांनी २५ वर्ष आदर्शवत चालवलेला संसार हा कौतुकास्पदच आहे. अनोख्या पद्धतीने लग्नाचा 2२५ वा वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना सुचलेली ही कल्पना, त्यांनी २५ वर्षांपूर्वी जसा प्रतिसाद दिला तसा २५ वर्षानंतर सुद्धा दिलेला प्रतिसाद हा जमलेल्या उपस्थितीवरून समजत होता.या अनोख्या लग्न सोहळ्याला या २५ वर्षांपूर्वीच्या नवरा नवरीचा अनोळखीपणा असुनही तवसाळ गावातील शेजारी मंडळींनी दिलेली भक्कम साथ आणि विकसनशीत पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण होणाऱ्या तवसाळा गावात हा रंगलेला अनोखा लग्न सोहळा परिसरात आकर्षणाचा विषय झाला आहे. या लग्न सोहळ्यासाठी दिनेश दिवेकर यांच्या आई शुभांगी दिवेकर,बहीण तेजश्री भालेकर, सुरेश भालेकर, सुदाम दिवेकर, भुषण दिवेकर, दीपक दिवेकर, रेशमा दिवेकर, निकिता दिवेकर, तेजश्री भालेकर, दीपक मिशाळ, नैना मिशाळ, दिपाली मिशाळ, देवेंद्र पडवळ ,चैत्राली पडवळ, किसन पड्याळ, अशोक पड्याळ, अनंत पड्याळ,राजश्री गंधेरे, प्रतिभा गंधेरे, माया पड्याळ, या त्यांच्या संबंधित नातेवाईकांबरोबरच कल्पवृक्ष पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष निलेश सुर्वे,ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रियांका सुर्वे, प्राजक्ता सुर्वे, संगीता सुर्वे, प्रीती गडदे, स्वामिनी सुर्वे आदींसह तवसाळ गावातील बहुसंख्या मान्यवर मंडळी उपस्थित होती. पर्यटनदृष्ट्या विकसित होत असणाऱ्या तवसाळ गावामध्ये ३१ डीसेंबर २०२२ रोजी लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुनश्च रंगलेला विवाह सोहळा सर्वांना प्रेरित व आकर्षित करणाराच होता.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here