वेळ अमावस्या, वाचा काय आहे परंपरा……

0
344
बातम्या शेअर करा

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीशी निगडित अनेक सणवार उत्सव देशातील विविध राज्यात साजरे केले जातात. असाच एक सण म्हणजेवेळ अमावस्या आज (23 डिसेंबर 2022) वेळ अमावस्या आहे. याला येळवस अमावस्या असंही म्हणतात. हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील सर्वजण आज शेतात वनभोजनाचा आनंद लुटतात.

लातूर सह मराठवाड्यातील नांदेड,सोलापूर, उस्मानाबाद यांचा भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक बाज सारखा असल्याच्या अनेक खुणा जागोजागी दिसतात. वेळ अमावस्या साजरी करण्याची शेकडो वर्षापासून परंपरा मराठवाड्यात आजही पाळली जाते. कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्ष जुना सण म्हणजे वेळ अमावस्या. या सणाला हिरवाईचा अपूर्व सोहळा असंही म्हटलं जातं.

नेमकी काय आहे परंपरा?
भारतीय व्दिपकल्पात सिंधु संस्कृतीपासून नदीचे जल पुजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या ( सप्त सिंधु ) भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंदु मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्त सिंधुचे प्रतिक म्हणून पुजले जावू लागले. विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे. तिला मराठवाड्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तुच आमची राखण करणारी सहारा देणारी ,पाणी पाजणारी. याच आसराची पुजा वेळा आमवस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्याची कोप करुन भक्ती भावाने केली जाते. आणखी एक परंपरा म्हणजे शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे. शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध, फुले, धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे. असाही एक रिवाज चालत आलेला आहे. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभऱ्याच्या वावराला ओवाळून काढायची प्रथा आहे. त्यानंतर तो टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा. मोठी आग करुन ती शमली की तिच्या राखेतून विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायची परंपरा आहे.

रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना केली जाते

2022 या वर्षातील आजची शेवटची अमावस्या आहे. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. या दिवशी मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. गावातील सर्व थोर, लहान शेतात गोळा होत या काळ्या आईची पूजा करतात. तिला गोडाधोडाचा नैवद्य दाखवत आणि वनभोजनाचा आनंद लुटतात. आज शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. तसेच रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी देवाकडे प्रार्थना केली जाते. मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आणि परळीचा उर्वरित भागात साजरा होतो. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो.

शहरी भागातील लोकांसाठी हा सण म्हणजे पर्वणी

आज एका रंगवलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी, बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भज्जी, खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनवलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात. सणानिमीत्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी लातूर शहरात अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस व खेडी माणसांनी आनंदाने हर्षोल्हासीत झालेली असतात.

या काळात रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग असतो. अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पुजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते.

वेळ अमावस्या हिवाळ्यात साजरी केली जाते

आयुर्वेदानुसार, हिवाळा ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो. या दिवसात फळे आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचनसंस्था चांगली राहते. शरीर कोरडं आणि रुक्ष पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. यामुळे वेळ अमावस्याला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थ्यांची घरोघरी एक मेजवानी असते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here