गुहागर – पाच वर्षांपूर्वी निवडणूक लढवली म्हणून गावातल्या नागरिकांनी त्यांना टाकलं वाळीत त्यानंतर त्या वाळीत प्रकरणाला काही ग्रामस्थांनी विरोध केला म्हणून त्यांनाही टाकलं वाळीत अशी खेदजनक घटना गुहागर तालुक्यातील गोणवली गावात घडली असून गेल्या पाच वर्षापासून या गावातील नागरिक आपल्या हक्कासाठी लढतात मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याने या गावातील ती घर अद्यापही वाळीतच आहेत.
गोणवली गावात २०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत समीक्षा सुनिल बोले यांनी ग्रामपंचायत निवडणूकित स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढविल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाबरोबर जे बोलतील किंवा जे संबंध ठेवतील त्यांना वाळीत टाकलं तर समीक्षा सुनिल बोले यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याच्या निर्णयास विरोध केला म्हणून सहाणवाडीतील १५ घरे व आग्रे वाडीतील ४ घरे वाळीत टाकली. आता एकूण गावातील 26 घर ही वाळीत टाकले आहेत. वाळीत टाकलेल्या कुटुंबास सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी करत नाहीत जर सहभागी झालो तर दमदाटी करतात व सहभागी होण्यास विरोध करतात. असा सर्व प्रकार गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. या गोणवली गावाचे पोलीस पाटील तानाजी फडकले हे संबंधित व्यक्तींना सहकार्य करत असल्यामुळे या लोकांची मुजोर व हुकमशाही वाढली आहे.
या गावातील शिवराम सदाशिव मोहिते , मिलिंद शंकर मोहिते ,संतोष विश्राम बोले , गणपत पांडुरंग सोलकर , प्रमोद शंकर सोलकर ,बाबु गणु सोलकर , शंकर महादेव मोहिते ,अनंत तानाजी मोहिते तुकाराम रामचंद्र मोहिते , लक्ष्मण महादेव मोहिते , अनिल तानाजी कुळे ,अनंत सदाशिव कुळे , तानाजी धोंडू फडकले या संबंधित व्यक्तींमुळे गावात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे त्यामुळे आमच्या जीविताला धोका आहे. तरी ह्या संबधित व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून घेत नसतील तर त्यांनाही त्यापासून प्रतिबंध करावा अशी मागणी या गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
सध्या या गावात पुन्हा एकदा निवडणूक 18 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा पाच वर्षांनी पुढे आले. या गावातील नागरिकांनी 2017 पासून प्रशासनाला लेखी तक्रारी दाखल केलेत 2019 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लेखी तक्रार दिली मात्र मध्ये कोरोनाचा काळ असल्यामुळे हे प्रकरण शांत होतं. आता पुन्हा निवडणुका लागल्याने या वाळीत प्रकरणाने जोर धरल्याने प्रशासन या कुटुंबांना न्याय देणार का असा प्रश्न त्या निमित्ताने उभा राहिला.