चिपळूण पालिका कोमात! अनधिकृत बांधकामे जोरात!! पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

0
104
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण नगरपालिका प्रशासन या ना त्या कारणाने वादात असतानाच आता शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात पालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आणि त्यांचे सहकारी अधिकारी आपली जबाबदारी पार पाडत नसल्याने आता त्याबाबत थेट पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे कळते.
चिपळूण शहर वेगाने वाढत आहे, मात्र त्याचवेळी शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत, तर काही चालू अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकदा लोकांची फसवणूकही होत आहे. चिपळूण शहराला दोन वर्षांपूर्वी बसलेल्या महापुराच्या तडाख्याला अन्य जशी कारणे जबाबदार आहेत त्याप्रमाणेच अनधिकृत बांधकामे हेही एक कारण असल्याचे दिसून आले आहे. असे असतानाही पालिका प्रशासन आणि त्यांचे प्रमुख यांच्याकडून अनधिकृत बांधकामांकडे होणारे दुर्लक्ष संतापजनक आणि आश्चर्यकारक आहे. सामान्य माणसाला छोटेसे घर किंवा अन्य बांधकाम करायचे असेल तर प्रशासन अडचणी आणते. तसेच एखाद्या सामान्य माणसाचे किरकोळ बांधकाम अनधिकृत असले तरी त्याला कायदा शिकवला जातो. त्याचवेळी धनदांडगे जेव्हा अनधिकृत बांधकामे करतात तेव्हा मात्र हेच प्रशासन झोपेचे सोंग घेते किंवा कोमात जाते.
शहरातील अनधिकृत बांधकामे रोखणे, त्यांच्यावर कडक कारवाई करणे अपेक्षित असताना प्रशासन मात्र त्यांच्यापुढे नतमस्तक होत असल्याचे चित्र आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असतानाच काही हौशी राजकीय पुढारीही आपले प्रस्थ वाढविण्यासाठी अशा अनधिकृत बांधकामाना राजाश्रय देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जाते. आता यांसदर्भात आमदार शेखर निकम यांनी जातीने लक्ष घालून चिपळूण शहराला पडत असलेला अनधिकृत बांधकामांचा विळखा थांबवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याचबरोबर पालकमंत्री उदय सामंत यांचेही या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात येणार आल्याचे सांगण्यात येते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here