चिपळूण – अन्न व औषध प्रशासनाने बेकायदा गुटखा साठ्यावर केलेल्या कारवाईनंतर गुटखा विक्री न थांबता याउलट चिपळूण शहर बाजारपेठेत बिनधास्तपणे पानटपऱ्यावर गुटखा विकला जात आहे.
यातूनच गुटखा विक्रेते अशा कारवायांना महत्व देत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे पूर्वीच्या दरापेक्षा वाढीव दराने गुटखा विकला जात असून यात विक्रेत्यांची चांगलीच कमाई सुरु आहे. अशा गुटखा विक्रेत्यांवर ठोस कारवाईसाठी पुन्हा अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
छुप्या पद्धतीने जोरदार गुटखा विक्री सुरु असल्याची माहिती मुंबई व रत्नागिरी अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर रुमानी चेंबर येथे सिध्देश सचिन खेराडे याचा ३ लाख ४६ हजार ४७९ रूपये तसेच रंगोळा साबळे मार्गावरील नजराणा अपार्टमेंट येथून शहनवाज मुस्ताक कच्छी, मुस्ताक झिकर अब्दुल गणी कच्छी, समीर अयुब शेख यांच्याकडील १ लाख ४७५ रुपये किंमतीचा बेकायदा गुटखा साठा जप्त केला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या या बेधडक कारवाईनंतर बाजारपेठेतील गुटखा विक्री बंद होईल अशी अपेक्षा असतानाच याउलट या कारवाईला विक्रत्यांनी तितकेसे महत्व दिले नसून पुन्हा नव्या जोमाने छुप्या पद्धतीने जोरदार गुटखा विक्री सुरु आहे. विशेष म्हणजे गुटखा पुरवठा करणाऱ्या बड्या व्यावसायिकांना यासाठी वरून आशीर्वाद मिळत असल्याने तेही बिनधास्त आहेत.
सद्यस्थितीत छुप्या पद्धतीने गुटखा विक्री जोरदारपणे सुरु असून यासाठी पूर्वीच्या दरापेक्षा तो वाढीव दराने विकला जात असल्याने यातूनच पानटपरीधारकांची चांगलीच कमाई होत आहे. याच संधीचा फायदा घेऊ काहींनी गुटख्याची मोठी आवक करुन ठेवली आहे. तालुक्यातून गुटखा विक्री हद्दपार व्हावा यासाठी खऱ्याअर्थाने पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्याची गरज असून त्यांच्या बेधडक कारवाईमुळे निश्चितच गुटखा विक्री हद्दपार होईल, असा विश्वास नागरिकांना वाटत आहे.