मंडणगड – महाड तालुक्यातील जांभळी गावानजीक सावित्री नदीपात्रात महसूल विभागाद्वारे नदीतील गाळ उपसा करण्याच्या निविदा मिळालेल्या ठेकेदार एजन्सीद्वारे गाळ उपसा करण्याबरोबरच अवैद्यरीत्या रेतीचा उपसा करून ती चोराटी मार्गाने वाहतूक करून मंडणगड, दापोली, खेड या तालुक्यात व नजीक असलेल्या आंबेत या ठिकाणी विकली जाते, अश्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.
विशेष म्हणजे नागरिकांच्या वाहतुकीसाठी असलेल्या म्हाप्रळ – आंबेत फेरीबोटीतून वाळूने भरलेल्या डंपरना प्राधान्य दिले जात असल्याची देखील तक्रार जोर धरू लागली आहे. त्यामुळे येथील सबंधित प्रशासन दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न येथील नागरिक आता विचारू लागले आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यादरम्यान जलसंधारण व महसूल विभागाच्या वतीने महाड तालुक्यातील जांभळी गावानजीक सावित्री नदीपात्रातील गाळ उपसा करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्याद्वारे नदीपात्रातील गाळ उपसा करण्याच्या ठेका मिळालेल्या ठेकेदार एजन्सीला सबंधित विभागाने घालून दिलेल्या अटी व शार्थींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले. मात्र या ठेकेदार एजन्सीने विभागाच्या या अटी व शार्थींना केराची टोपली दाखवली आहे. नदीपात्रातून उपसा करण्यात आलेला गाळ हा सक्शन पंपाच्या सहाय्याने फिल्टरेशन करून गाळ बाजूला करून उर्वरित वाळू हि बाजारात अवैद्यारीत्या चढ्या भावाने विकण्याचा घाट घातला आहे. यादरम्यान प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सबंधित एजन्सीने मंडणगड, दापोली, खेड या नजीकच्या तालुक्यात व आंबेत या ठिकाणी चोराटी वाळूची बिनबोभाट अवैद्यरीत्या वाहतूक करून पाच हजार प्रति ब्रास अश्या चढ्या दराने विक्री सुरु केली आहे. वास्तविक पाहता, या एजन्सीला गाळ काढण्याचा व तो ठराविक ठरवून दिलेल्या जागेवर साठवण्याची अट प्रशासनाने घातली असताना एजन्सीने हा आपल्या स्वतःच्या प्लॉटवर साठवून अनधिकृतपणे आपला चोराटी वाळू व्यवसाय सुरु केला. एजन्सीच्या व्यावसाईक चातुर्यावर प्रशासनाची करडी नजर अपेक्षित होती. मात्र प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अवैद्य रेती धंद्यास चालना मिळत असल्याने तक्रारीचे सूर वाढत आहेत. आता तरी सबंधित विभागाने या गंभीर प्रकारावर लक्ष देवून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आता येथील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.