चिपळूण – एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावरून कामावर पुन्हा रुजू झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या नव्वद एसटी गाड्यांचे वेळापत्रक एसटीच्या रत्नागिरी विभागाने जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील सर्व नऊ जागा आगारांमधून या गाड्या सुटणार आहेत. मुंबई, ठाणे, नालासोपारा, बोरिवली, पुणे, चिंचवड, अक्कलकोट, कोल्हापूर, मिरज, सांगली, अंबाजोगाई, गडहिंग्लज, स्वारगेट, नृसिंहवाडी आंजर्ले अशा सर्व दूरच्या मार्गावरील सर्व गाड्या नियमित सुरू झाल्या आहेत.
दरम्यान कोकण विभागातील ५० टक्के एसटी वाहतूक सुरू झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून ४ हजार ९१० पेक्षा अधिक कर्मचारी संप सोडून कामावर हजर झाले आहेत. गेल्या २८ ऑक्टोबर २०२१पासून राज्यातील जवळपास ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. संपामुळे राज्यातील एसटी सेवा ठप्प झाली होती. गेल्या ८ एप्रिल ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील आगारांत १ हजार ४२५, रायगड जिल्ह्यातील आगारांत १ हजार ६४४, रत्नागिरी जिल्ह्यातील आगारांत १ हजार १२५ आणि पालघर जिल्ह्यातील आगारांत ७१६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. कोकणात लवकरच शंभर टक्के एसटी वाहतूक सुरू होईल, असे सांगण्यात आले.















