चिपळूण – चिपळूण मधील वाशिष्ठी आणि शिवनदीचा गाळ काढण्याचे काम सुरू आहे, मात्र या कामासाठी लागणाऱ्या डिझेल मध्ये हेराफेरी करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर पाच कंत्राटी चालकांना निलंबित करण्यात आले होते.
केवळ निलंबन करून चालणार नाही तर यातील रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्यासाठी संबंधित चालकांवर गुन्हे दाखल करा असे आदेश मंत्री उदय सामंत यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.उदय सामंत यांनी आज चिपळूण येथे प्रांताधिकारी कार्यालयात गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेतला. डिझेल चोरी हे मोठे पाप असून तुम्ही चिपळूणकर जनतेच्या जीवाशी खेळत आहात, असले उद्योग थांबवा नाहीतर नियतीही तुम्हाला माफ करणार नाही अशा शब्दांत सामंत यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. सामंत यांनी डीवायएसपी बारी यांनाही यात तातडीने लक्ष घालून या रॅकेटचा पर्दाफाश करावा अशी सूचना केली. वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी डिझेल सह इतर खर्चासाठी दोन कोटींचा निधी जलसंपदा विभागाकडून यांत्रिकी विभागाकडे वर्ग केला होता. या दोन्ही नद्यांमधील गाळ काढण्याचे काम जानेवारीपासून सुरू आहे. नाम फाउंडेशन च्या पोकलेन व डंपरलाही यांत्रिकी विभागाकडून डिझेल चा पुरवठा करण्यात येत होता. यांत्रिकी विभागाकडील डंपर, टिपर व पोकलेन वर कंत्राटी चालकच जास्त प्रमाणात काम करत आहेत. गाळ काढण्याच्या कामावर आणि दैनंदिन डिझेलवर देखरेख करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचा फायदा उठवत कंत्राटी चालकांनी डिझेल चोरीचा प्रताप केला. डिझेल चोरी होत असल्याची कुणकुण चिपळूण बचाव समितीला लागल्यावर पाच कंत्राटी चालकांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या डिझेल घोटाळ्याची यांत्रिकी विभागाकडून चालू असण्याचे सांगण्यात येते. हा डिझेल घोटाळा सुमारे ४० ते ५०लाखांचा असल्याची आणि यात अनेकांचा सहभाग असल्याचे संशय बैठकीत व्यक्त करण्यात आला. डिझेल साधारण साठ ते सत्तर रुपये लिटर या दराने विकले गेल्याची व त्यातून विकणारा आणि घेणारा यांनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याची शक्यता बैठकीत व्यक्त करण्यात आली.