गुहागर – समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या कासवांपैकी ’प्रथमा’ने गुजरातचा किनारा गाठला आहे. या कासवाने सर्वाधिक ३३० किलोमीटरचा प्रवास केला आहे. तर सावनी आणि वनश्रीने रेवाच्या दिशेने आणखी दक्षिणेकडे म्हणजेचे कर्नाटकच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली आहे. रीवा सातत्याने दक्षिणेकडे सरकत असून ते मंगळुरूला ८० किमीवर आहे.
कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणार्या ऑलिव्ह रिडले जातीचया कासवांचे संवर्धन करुन अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानकडून पावले उचलण्यात आली आहे. गेल्या तिन महिन्यात पाच कासवं सोडण्यात आली होती. त्यातील लक्ष्मी हे कासव महिन्याभरातच संपर्काबाहेर गेले. उर्वरित चार कासवांची सद्यःस्थितीवर कांदळवन विभागचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे लक्ष ठेवून आहेत. वेळास, आंजर्ले, गुहागर या किनार्यांवर अंडी घालून समुद्रात जाणार्या कासवांना टँगिंग करण्यात आले. प्रथमा या कासवाचा प्रवास पुढेच सुरु असून ते गुजरातच्या किनार्यावर आहे. आतापर्यंत वेळासपासून त्या कासवाने ३३० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. ते सध्या दीव किनार्यापासून ६५ किमी अंतरावर आहे. सावनी हे सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून सुमारे ९० किमी सरळ रेषेत प्रवास करत आहे. रीवा सातत्याने दक्षिणेकडे सरकत असुन आणि गोवा ओलांडून ते कर्नाटकच्या पाण्यात शिरली आहे. सध्या कर्नाटकातील कारवारपासून ४० किमी अंतरावर आहे. वनश्री किनार्याने दक्षिणेकडे जात असून ते सध्या आंबोळगड किनार्यापासून सुमारे २५ किमी सरळ रेषेत आहे.