खेड – सह्याद्रीच्या एका टोकाला असलेल्या खेड तालुक्यातील रसाळगड येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी गणेश रघुवीर यांच्या मार्गदर्शनाने किल्ल्याच्या अभ्यास मोहिमेदरम्यान अत्यंत कठीण कड्यावर १५० फुट दरीतील तोफ गडावर आणण्याचे काम केले.
गड परिसर व गडावरील दुर्ग अवशेष याची नोंद करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या रसाळगड परिसरात अभ्यास करत असताना अमोल भुवड,महेश जाधव,ललीतेश दिवटे,प्रमोद सावंत,सागर पाटील यांना गडावरील झोलाई देवी मंदिरातील पुजारी शिवाजी सकपाळ यांनी गडाच्या पश्चिमेकडे तोफ असण्याची शक्यता संगीतली होती. सदर ठिकाणी पाहणी करण्यासाठी खोलदरी व कड्याचा अंदाज घेऊन गिर्यारोहक प्रमोद सावंत यांनी प्रस्तारोहण साहित्य सेटअप लावला. गणेश रघुवीर यांनी राप्लिंग करत अत्यंत कठीण कड्यावर १५० फुट दरीत शोधकार्य सुरु केले. त्यावेळी गडाच्या पश्चिम दिशेकडील पीर बुरूजाखाली दरीत तोफ मातीती रुतलेल्या स्थितीत आढळली. प्रस्तारोहण साहित्य व सेफटी यांचा वापर करून या सदस्यांनी स्थानिक ग्रामस्थांन सोबत तोफ वर खेचण्यास सुरवात केली. तोफेला दोराने बांधून अवघ्या ३ तासांत वर काढण्यात आले. या तोफेची लांबी ४.६ फुट एवढी असून हि तोफ साधारण एक टन वजनाची आहे. तोफ सुस्थितीत असून तोफेला गडाचा तिसरा दरवाजा व पीर बुरुज येथे ठेवण्यात आले. या तोफे संदर्भातील माहित व अहवाल राज्य पुरातत्व विभाग रत्नागिरी यांना देण्यात आलेली असून सदर तोफ सह्याद्री प्रतिष्ठान खेड विभागामार्फत झोलाई मंदिराजवळ ठेवण्यात येईल असे खेड विभागाचे सदस्य अमोल भुवड आणि महेश जाधव यांनी सांगितले.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2022/03/IMG-20220309-WA0044-1024x682.jpg)
सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गडकोट संवर्धनाचे काम गेली १४ वर्ष संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी गेली ४ वर्ष कार्य करत असून जिल्ह्यातील मंडणगड आणि बाणकोट या किल्ल्यांवर लोक वर्गणीतून तोफांना सागवानी तोफगाडे बसविण्यात आले आहेत. रसाळगड सुर्वर्णदुर्ग कनकदुर्ग,गोवागड,पालगड या किल्ल्यांवरसतत दुर्गसंवर्धनदुर्ग संवर्धनाची कामे वन विभाग राज्य पुरातत्व विभाग आणि केंद्र पुरातत्त्व विभाग अंतर्गत सुरु आहेत. खेड तालुक्यातील रसाळगडावर यापूर्वी स्वच्छता मोहिमा,जागतिक वारसा सप्ताह आणि गड पायथ्याशी सूचना फलक लावण्याची कामे झाली आहेत.