सायकल स्पर्धा ; नवी मुंबई ते दापोली २०० किमी दहा तासात पार.

0
470
बातम्या शेअर करा

दापोली – नवी मुंबई ते दापोली अशी २०० किमीची बीआरएम सायकल स्पर्धा अडॉक्स इंडिया रँडोनीअर (एआयआर), नवी मुंबई कल्याण सायकलिस्ट आणि फ्रान्समधील अडॉक्स क्लब पेरिसियन (एसीपी) या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित केली होती. या स्पर्धेत दहा तासात २०० किमी अंतर सायकलवर कापून सुरवातीचे सायकलस्वार दापोलीला पोहोचले. या सर्वांचे दापोली परिसरात ठिकठिकाणी दापोलीकरांनी जोरदार स्वागत केले. नीलकृपा बीच रिसॉर्ट सालदुरे येथे दापोली सायकलिंग क्लब आणि रिसॉर्ट मालक निलेश कदम परिवारातर्फे या सायकलस्वारांचा सत्कार व पाहुणचार करण्यात आला.

बीआरएम हा रँडोनीअरिंगचाच एक प्रकार आहे. रँडोनीअरिंग म्हणजेच स्वबळावर केलेलं लांब पल्ल्याचं सायकलिंग. फ्रान्समधील अडॉक्स क्लब पेरिसियन (एसीपी) ही आंतरराष्टीय संस्था सायकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी बीआरएम सायकल स्पर्धेचे आयोजन करत असते. या बीआरएम सायकल स्पर्धेचा मार्ग नवी मुंबई कळंबोली – पनवेल – पेण – नागोठणे – माणगाव – महाड – लाटवण – पालगड – दापोली – नीलकृपा बीच रिसॉर्ट सालदुरे असा होता. सकाळी ५ वाजता नवी मुंबईहुन ही स्पर्धा सुरु झाली. मार्गावरील लहान मोठे घाट ओलांडत सुरवातीचे सायकलपटू दुपारी तीन वाजता सालदुरे दापोली येथे पोहोचले आणि शेवटचे सायकलपटू संध्याकाळी साडेआठ वाजता पोहोचले.

पहिले पाच सायकलपटू शशिकांत पाटोळे, प्रविण मेनन, मुस्तफा पत्रावाला, मनोहर दिक्षित, चेतन मुकादम हे होते. पन्नास वर्षावरील अनेक सायकलपटू यामध्ये सहभागी झाले होते. यातील सर्वांनी हे २०० किमीचे अंतर सायकलवर पूर्ण केले. या सर्वांशी गप्पा मारत, त्यांचे अनुभव जाणून घेण्यामध्ये दापोलीकर नागरिक गुंग झाले होते. १९ वर्षाचा मुस्तफा पत्रावाला याने नुकतीच जागतिक पातळीवरील अतिशय खडतर मानली जाणारी ६४३ किमीची डेक्कन क्लीफहँगर रेस २६:५३ तासात पूर्ण केली आहे आणि तो रेस अक्रॉस अमेरिका या नावाजलेल्या अतिशय कठीण स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. सिद्धार्थ भामरे यांनी यांनी लांब अंतराच्या जागतिक पातळीवरील अनेक स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. अब्दुल काझी सायकल जनजागृतीसाठी अनेक उपक्रम करत असतात. पराग कुलकर्णी यांनी सायकल चालवून २० किलो वजन कमी केले आहे. ५५ वर्षाचे बिभू नायक तंदुरुस्तीसाठी नेहमी सायकल चालवत असतात. जॉबी टॉम मॅथु, राहुल कोयंडे, रणजित वर्मा, माधव वारे, अरुण खेडवल, प्रविण शेलार, रुपेंद्र मेश्राम, जितेश शाह, संचित शेट्ये, पावन त्रिपाठी, परविंदर सिंग भामरा इत्यादींनी अनेक सायकल स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत, या सर्वांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अचंबित करणारी होती. सायकल चालण्यामुळेच आरोग्य चांगले राहिले असे सर्वांनी मान्य केले. आज ते आरामात १००, २००, ३००, ४००, ६०० अशा मोठ्या अंतराच्या सायकल राईड करतात.

साडेतेरा तासात ही २०० किमीची बीआरएम पूर्ण केलेल्यांना अडॉक्स क्लब पेरिसियन (एसीपी) फ्रान्सतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेडल व प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. काही जणांना हे अंतर ठराविक वेळेत पूर्ण करता नाही आले. त्यांनीही नाराज न होता दापोली परिसराची आणि दापोलीकरांची स्तुती केली आणि पुन्हा अधिक तयारी करुन दापोलीला येणार असे ठणकावून सांगितले.

दापोलीच्या मार्गावरील नैसर्गिक सौंदर्य आणि रस्त्याच्या बाजूला असलेली हिरवीगार दाट जंगले वनस्पती, शहरापासून दूर असणारी शांतता हे सगळे अनुभवत सायकलपटू इथे आले होते. दापोलीकरांच्या आपुलकीपूर्वक स्वागताने हे सर्व सायकलपटू अजून भारावून गेले. आणि या सर्वांच्या चेहऱ्यावरील २०० किमी सायकल प्रवासाचा थकवा गायब झाला. या सर्वांनी आणि स्पर्धेचे आयोजक नवी मुंबई कल्याण सायकलिस्ट ग्रुपचे सिद्धार्थ भामरे यांनी दापोलीकरांचे आभार मानले. दैनंदिन जीवनात सायकलचा जास्तीच जास्त वापर करुन पर्यावरण व नैसर्गिक सौंदर्य याचे जबाबदारीपूर्वक असेच जतन करावे आणि आरोग्य फिट बनवावे असे दापोलीकरांना आवाहनही केले. या स्वागत समारंभ सोहळ्यासाठी दापोली सायकलिंग क्लबचे मिलिंद खानविलकर, सुरज अंबरीश गुरव, आकाश तांबे, विनय गोलांबडे, राकेश झगडे, मृणाल खानविलकर, संदीप मांजरे आणि नीलकृपा रिसॉर्टचे निलेश कदम, विनोद पांचाळ इत्यादी अनेकांनी मोलाचे सहकार्य केले. हे सर्व सायकलस्वार सालदुरे येथे मुक्कामी राहिले. दुसऱ्या दिवशी येथील समुद्र बीच परिसर फिरुन रविवारी बसने परतीचा मुंबई प्रवास केला. दापोलीकरांचे आदरातिथ्य पाहून पुन्हा नक्की दापोलीला येणार असे सर्वांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here