गुहागर – गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथील शिक्षक बसवंत थरकार यांच्या ‘नवी पहाट’ या कविता संग्रहाचे प्रकाशन पाटपन्हाळे कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जालिंदर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ‘कोकण किनारा’ अंकाचे संपादक तसेच को.म.सा.प.चे माजी अध्यक्ष संतोष आग्रे तर प्रमुख अतिथी म्हणून अक्षरदीप प्रकाशन कोल्हापूरचे प्रकाशक प्रा. वसंत खोत व ज्युनिअर कॉलेज गुहागर येथील प्रा. मनाली बावधनकर उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन प्रकाशन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्रा. डॉ. सुभाष खोत यांनी केले. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व सांगून अत्यंत सुंदर शब्दांत कवी परिचय करुन दिला. त्यानंतर. प्रा. महावीर थरकार यांनी मंचावरील मान्यवरांचा परिचय करुन देत असतानाच मान्यवरांना शाल. सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हृदयसन्मान केला. या प्रसंगी गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे अध्यक्ष गोरिवले व सचिव पांडुरंग हासबे, कास्ट्राईब संघटने तर्फे सुधाकर कांबळे सर, पाटपन्हाळे प्रशालेतर्फे श्री सुनिल घाणेकर व श्री सुमंत भिडे यांनी तर तळवली प्रशालेतर्फे श्री उत्तम कचरे व श्री संदेश देवरुखकर यांनी सत्कारमूर्ती कवी बसवंत थरकार यांचा सत्कार केला. मुंबई हायकोर्टाचे वकील ॲड. संदीप आग्रे व संपादक संतोष आग्रे, माजी मुख्याध्यापक पी. ए. शिर्के, प्रा. डॉ. आनंद कांबळे, गुहागर येथील मयूर माने व मिथून माने, संपादक संजय गमरे यांनीही कवी बसवंत थरकार यांचा सत्कार करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दहिवली प्रशालेचे शिक्षक श्री मयूर माने, कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचे प्रा. अमोल जड्याळ व गुहागर हायस्कूलचे उप-मुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे यांनी नवी पहाट या पुस्तकातील एक-एक कविता सादर करुन त्यावर सुंदर शब्दांत विवेचन केले व रसिकांची मने जिंकली. प्रमुख अतिथी प्रा. सौ. मनाली बावधनकर यांनी बसवंत थरकार यांच्या ‘नवी पहाट’ या पुस्तकातील जवळ-जवळ सर्वच कवितांचा दाखला देत सहज सुंदर शब्दांत संग्रहाचे अंतरंग उलगडून दाखवले. पुस्तकात कवीने अनेक विषय हाताळले गेले असून त्यांच्या सर्वच कविता आशयपूर्ण असून वास्तवाशी नाती जोडणाऱ्या आहेत. कवीला स्त्रियांविषयी आदर आहे, त्यामुळे त्यांनी संग्रहात स्त्रियांचा गौरव केलेला दिसून येतो.. सामाजिक भेदभाव मिटावेत, देशात समता प्रस्थापित व्हावी, पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी कवी आग्रही असल्याचे सांगून हे पुस्तक सर्व वयोगटातील व्यक्तींच्या संग्रही असायला हवे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रा. डॉ. जालिंदर जाधव यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर त्यांनी पुस्तकातील अनेक कवितांच्या काही ओळींचा दाखला देत कवीला आजवर जे-जे अनुभवास आले ते-ते कवितेतून व्यक्त झाल्याचे सांगून कवीने सामाजिक आशयावर भर देत वास्तववादी, आश्वासक, धीर देणाऱ्या, प्रसंगी विद्रोही भूमिका घेत केलेल्या रचना लक्षवेधी आहेत, अशा प्रतिभावान कवीच्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्याहस्ते झाला हा माझ्यासाठी मौलिक व जतन करुन ठेवावा असा हा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक टी. ए. थरकार यांनी कवी बसवंत थरकार यांच्या पुस्तकाचे भरभरुन कौतुक करत असतानांच अकाली मृत्यूमुखी पडलेल्या त्यांचा मुलगा अभिजित याला हे पुस्तक अर्पण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्तही केली. या प्रसंगी कोल्हापूर येथील ‘अक्षरदीप’ प्रकाशनचे प्रकाशक व साहित्यिक प्रा. वसंत खोत यांनी पुस्तकातील अनेक कविता नातेसंबंध जपणाऱ्या व त्याची समाजाला जाणीव करून देणाऱ्या असल्याचे सांगून या कविता हाताळताना मला विशेष त्रास झाला नाही, त्या मुळे त्यांच्या पुढील पुस्तकाचे प्रकाशनही आपल्या कडूनच करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कवी बसवंत थरकार यांनी आपल्या मनोगतात पुस्तकासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचा नामोल्लेख करत त्यांचे ॠण व्यक्त केले. अक्षरदीप प्रकाशनने प्रकाशनाची जबाबदारी घेतली व ती व्यवस्थित पार पाडली याबद्दल त्यांना धन्यवाद व्यक्त करुन ‘आपले एक पुस्तक असावे हे अनेक वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न ‘नवी पहाट’ या कविता संग्रहाच्या रुपाने साकार झाले, याचा खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष, कोकण किनारा अंकाचे संपादक व को. म. सा. प. शाखा गुहागरचे माजी अध्यक्ष संतोष आग्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवी बसवंत थरकार यांचे कौतुक करतांना ज्यांनी आपल्याला हाताला धरुन वृत्तपत्रांसाठी बातमी लिहायला शिकवलं तसेच माझ्या वार्षिक अंकासाठी मार्गदर्शन करत राहिले. त्यासाठी लागणारे लेख व कविता देऊन सदैव मला सहकार्यच केले. असे माझे गुरुवर्य श्री बसवंत थरकार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या अध्यक्षते खाली पार पडत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. सर वरुन रागीट वाटत असले तरी आतून मात्र ते खूप हळवे आहेत. त्यांनी नेहमी आमच्यावर चांगलेच संस्कार केले आहेत. कोणी आपल्याशी कसेही वागले तरी आपण मात्र आपला चांगुलपणा सोडायचा नसतो, हे ते नेहमी सांगत असतात, असे सांगून त्यांना व त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा व्यक्त केल्या. गुहागर येथील मासिक सम्मासम्बुध्दचे संपादक, लेखक व प्रकाशक संजय गमरे यांनी कवी बसवंत थरकार यांनी लिहिलेले गीत आपण स्वतः स्टेजवरुन नाचून सादर केल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली व एक दिवस नक्कीच सरांचे पुस्तक प्रकाशित होईल असे वाटत होते, ते आज खरे ठरले असे सांगत भावी साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व मान्यवरांचे तसेच उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाचा समारोप केला.