चिपळूण -२२ जुलैच्या महापूरात उध्वस्थ झालेल्या चिपळूण शहर व परिसरात पुरमुक्तीच्या उपाययोजना राबविण्यात शासनाला रस नाही. गाळ काढण्यासाठी केवळ १० कोटीच गाजर दाखवून चिपळूणकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. महाविकास आघाडी सरकारने केवळ फसविण्याचा धंदाच सुरू ठेवला आहे. गाळाविषयी सरकार गंभीरतेने दखल घेत नाही. ज्या-ज्या भागात शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे जनतेवर अन्यायच होत आहे. खासदारांना तर गाळातलं काय कळतच नाही. उपोषणापर्यंत आमदार भास्कर जाधवांचे नेटवर्क पोहोचत नाही. यामुळेच चिपळूणकरांना न्याय मिळण्यासाठी अधिवेशनात भाजपच्या वतीने आवाज उठवून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार प्रसाद लाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ११ व्या दिवशी आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली. उपोषणाकर्त्यांचे म्हणणे एैकून घेतल्यानंतर यविरोधात आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कापसाळ विश्रामगृह येथे आमदार लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लाड म्हणाले, वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याची चिपळूणवासीयांची मागणी रास्त आहे. वाशिष्ठी नदीत ३ लाख ३० हजार घनमिटर गाळ काढण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी कागदोपत्री ७० हजार घनमिटर गाळ असल्याचे सांगतात. शासकीय विभागात एकमेकांच्यात ताळमेळ नाही. कोणाचा कोणाला पत्ता नाही. गाळ काढण्यासाठी ३०० कोटींची मागणी असताना केवळ १० कोटीचा निधी मंजूर होतो. ही लाच्छनास्पद बाब आहे. जिथे जिथे शिवसेनेचे प्राबल्य आहे, तिथे तिथे लोकांवर अन्याय होत आहे. येत्या ५ महिन्यात दोन्ही नद्यातील गाळ न काढल्यास पुन्हा चिपळूणात पुरपरिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात येतात, देवदर्शन घेतात. मात्र त्यांना उपोषणाचे काही देणे घेणे नाही. दोन दिवस जिल्ह्यात असतानाही त्यांनी चिपळूणकरांच्या उपोषणाला भेट देण्याचे टाळले आहे. चिपळूणकरांच्या आंदोलनात भाजपाने उडी घेतली आहे. आता चिपळूणकरांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, तालुकाध्यक्ष विनोद बोभसकर, शहराध्यक्ष आशिष खातू, नगरेसवक विजय चितळे, माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, परिमल भोसले उपस्थित होते.