खेड – शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना शिवसेनेने अखेर मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमधून रामदास कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
तसेच नव्या नियुक्त्यांमध्ये एकाही कदम समर्थकांना स्थान देण्यात आलेले नाही. आधी विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर आता कदम समर्थकांना जिल्हा संघटनेतून डच्चू दिल्याने रामदास कदम यांना हा थेट संदेश दिला गेला असल्याचे मानले जाते आहे. काही आठवड्यांपूर्वी कदम यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप बाहेर आली होती. त्यामुळे त्यांची गच्छंती झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत त्यांच्या समर्थकांना हटवून शिवसेनेने तात्काळ नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना मोठा झटका मिळाला आहे. शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जागा नाही हे पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुखांनी ठामपणे दाखवून दिल्याचीही चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रित येण्याची शक्यता आहे. भाजप विरोधात एकत्र येऊन निवडणुका लढवण्याबाबत या दोन्ही पक्षांत एकमत झाल्याचे सूचित करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यात बोलणीही झाल्याचे सांगण्यात आले.