कोजागिरी पौर्णिमा : जाणून घ्या तिथी महत्व आणि मान्यता

0
128
बातम्या शेअर करा

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राच्या या गुणांमुळेच ‘नक्षत्राणामहं शशी’, असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे. कोजागिरी म्हणजेच शरद पौर्णिमा कधी आहे? महत्त्व, मान्यता, परंपरा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जाणून घेऊया…
चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यातील नवरात्र, विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित असल्याचे दिसून येते. वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागिरी पौर्णिमा असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. चंद्राच्या या गुणांमुळेच ‘नक्षत्राणामहं शशी’ म्हणजे ‘नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे’, असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे. म्हणजेच शरद पौर्णिमा कधी आहे? महत्त्व, मान्यता, परंपरा आणि काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जाणून घेऊया…

आज मंगळवार, १९ ऑक्टोबर रोजी निज अश्विन पौर्णिमा आहे. कोजागरीला लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून ‘कोजागर्ती’? असा प्रश्न विचारते, असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी असे म्हणतात. मसाला दूध पिण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा’ म्हणतात, अशी मान्यता असल्याचे सांगिले जाते. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.


विशेष महत्त्व :
कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. काही मान्यतांनुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली, असे सांगितले जाते.


लक्ष्मीदेवीला नैवेद्य
भारतातील बहुतांश ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी देवी नारायणांसह गरुडावर आरुढ होऊन पृथ्वीतलावर येते. लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वी येतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात.


कोजागिरीला लक्ष्मी पूजनाचे महत्व :
कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मीदेवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. जी माणसे जागरण करत नाहीत, त्यांच्या दारावरून लक्ष्मी देवी परत जाते. कोजागिरीला केलेले लक्ष्मी पूजन विशेष मानले जाते. यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते. लक्ष्मी देवीच्या आशिर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णूसहस्रनाम आदींचे पठण करणे शुभ मानले जाते. दमा किंवा अस्थमा यांसारख्या आजारांवरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here