चिपळूण – चिपळूण येथील मध्यवर्ती एस.टी.स्टँड जवळील अरुण उपहार गृह शेजारून खेंड बायपास- कोल्हेखाजनकडे जाणाऱ्या टीपी रोडवरील अनधिकृत बांधकाम अखेर पालिकेने सोमवार दि.१८ ऑक्टोबर रोजी हटविण्यास सुरुवात केली. दरम्यान, हे काम मंगळवारीही सुरु राहणार असून नारळाची झाडे सुध्दा हटविण्यात आली असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी दि. १३ ऑक्टोबर रोजी अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी एस.टी.स्टँडसमोर गेले असता. आपटे कुटुंबियांनी या कारवाईत अडथळा निर्माण केला होता. हे बांधकाम हटविण्यासाठी पालिकेने पोलीस संरक्षणाची रितसर मागणी केली होती. पोलीस संरक्षण मिळण्यापुर्वीच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही कारवाई करण्यास प्रारंभ केला. परंतु यावेळी कोणीही विरोध केला नाही. त्यामुळे हे बांधकाम हटविण्यात अडचण आली नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. यावेळी प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, नगरअभियंता परेश पवार, स्वच्छता निरीक्षक महेश जाधव, वैभव निवाते, विनायक सावंत यांच्यासह आरोग्य व बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.