गुहागर – राज्य परिवहनच्या गुहागर आगरामार्फत आता सर्व प्रमुख मार्गावरची बससेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू झाली आहे. गेले अनेक महिने बंद असलेली शिवशाही बस आता पुणे-पिंपरी-चिंचवड मार्गावर धावू लागली असून, याच मार्गावर आरामदायी स्लीपर बस सुरू झाली असल्याची माहिती गुहागर आगारप्रमुखांनी दिली आहे.
गुहागर-तळी मार्गावरील मोडका आगर धरणावरील पूल बंद झाल्यापासून सुमारे दीड वर्ष आगारातील शिवशाही बससेवा बंद झाली होती. ही बससेवा पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी चालक व वाहकांचे पगार न देणे, बसला मेंटेनन्स न करणे यामुळे ही सेवा प्रवाशांना त्रासदायक ठरली होती. त्यानंतर मोडकाआगर पुलाचे काम सुरू झाल्यानंतर ही बससेवा बंद झाली. शिवशाहीच्या आता दोन बस गुहागर आगारात दाखल झाल्या असून पिंपरी-चिंचवडसाठी गुहागर सकाळी ७ वाजता व पिंपरी चिंचवडहून गुहागरसाठी सकाळी ७ वाजता अशा या दोन बस धावणार आहेत. या व्यतिरिक्त गुहागर आगारातून रात्री ९ वा. आरामदायी स्लीपर कोच बस पिंपरी-चिंचवडसाठी सुटणार आहे. या सुविधेमुळे पिंपरी-चिंचवडला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची आरामदायी प्रवासाची व्यवस्था गुहागर आगाराने केली असून पिंपरी-चिंचवड स्लीपर कोचचे भाडे ५१५ रुपये ठेवण्यात आले आहे. या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.