गुहागर – बनावट संमतीपत्र बनवून जमीन मालकाची कोणती परवानगी न घेता ग्रामपंचायतीला देत त्याच बोगस कागदपत्रावर असिसमेंटची नोंद करत फसवणूक केल्याप्रकरणी कोतळूक येथील सूगनदास बुधाजी मोहिते यांनी तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ माजली आहे.
कोतळूक बौद्धवाडी येथील सुगनदास बुधाजी मोहिते हे कामानिमित्त मुंबई येथे राहतात.ते सुशिक्षित असून ते सरकारी खात्यात जॉबला सुद्धा आहे. अशाच वेळी त्यांच्या नावाचं खोटं संमतीपत्र दस्तावेज ग्रामपंचायतीमध्ये दाखल करत कोतळूक गावच्या पोलीस पाटील यांचे पती यांनी शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केलाय.ही माहिती त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकारात मागवलेल्या कागदपत्रात पुढे आली आहे. या कागदपत्रांमध्ये त्यांच्या जागेवर तात्पुरते बांधकाम करण्यासाठी त्यांच्याच नावाचे खोटे संमतीपत्र बनवून त्यांच्या वडिलांच्या नावासमोर खोटा अंगठा लावून संमतीपत्र केल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या या माहितीमध्ये बुधाजी गंगाराम मोहिते, संदीप तुकाराम मोहिते ,सुगनदास बुधाजी मोहिते, विजय रामचंद्र मोहिते आदींची यासंबंधी पत्रावर नाव आहेत. संदीप तुकाराम मोहिते यांच्या पत्नी या गावच्या पोलीस पाटील असल्याने त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत खोटे संमतीपत्र बनवल्याचा आरोप मोहिते कुटुंबाने केला आहे. त्यामुळे ही खोटी कागदपत्रे सादर करून आमची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पोलीस पाटील व त्यांचे पती संदीप तुकाराम मोहिते यांवर कारवाई करावी यासाठी सुगनदास मोहिते यांनी ग्रामविकास अधिकारी कोतळूक, तहसीलदार गुहागर , गटविकास अधिकारी गुहागर, पोलीस निरीक्षक गुहागर ,जिल्हा अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
कोकणात अनेक जण कामानिमित्त मुंबई येथे राहात असतात सणासुदीला ते कोकणात येतात त्यामुळे त्यांच्या गावाकडील जमिनीवर , शेती वर,घरावर अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या कब्जा केलेले अनेक प्रकरण पुढे येत आहेत. त्याची फसवणूक केली जाते तो जोपर्यंत गावाला येत नाही तोपर्यंत त्याचा थांगपत्ता त्या नागरिकाला किंवा त्या व्यक्तीला लागत नाही त्यामुळे अशी अनेक प्रकरणे सध्या कोकणात उघडकीस येतात बोगस संमतीपत्र बनवणाऱ्या या कुटुंबावर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.