चिपळुण – अतिवृष्टी आणि महापुरामुळे बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील पुलाचा अॅप्रोच रोड खचला होता. तत्पूर्वी या पुलावरील वाहतूक बंद केल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. तब्बल पाच दिवसानंतर अवजड वाहने वगळता अन्य वाहनांसाठी हा पूल खुला करण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बहादूरशेख नाका येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
दरम्यान या पूलावरील अॅप्रोच रोड खचल्याची घटना समोर आली. या पुलावरील वाहतूक बंद ठेवल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर अजूनही अवजड वाहने कळंबस्ते मार्गावर उभी करून ठेवण्यात आले आहेत. चिपळूणच्या दिशेला उभी करण्यात आलेली वाहने कुंभार्ली घाट मार्गे वळवण्यात आली आहेत. तसेच एन्रॉन पूल खचला असल्याने या मार्गावरील वाहतूक देखील बंद आहे. यामुळे वाहनचालकांना पेठमाप पुलावरून ये-जा करावी लागत आहे. दरम्यान आता तब्बल पाच दिवसामध्ये चेतक रीगल कंपनीने ॲप्रोच रोडचा खचलेला भाग पूर्णपणे भरवणे भरून हा पूल वाहतुकीस योग्य केला आहे. या पुलावरून अवजड वाहने वगळता अन्य वाहनांसाठी हा पूल खुला करण्यात आला आहे. यासाठी दोन्ही बाजूला अवजड वाहने जाऊ नये याकरता लोखंडी कमान उभी केली आहे. परंतु छोट्या वाहनांसाठी वाहतूक खुली झाली असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.