गुहागर – गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे केवळ शृंगारतळी वासियांसाठी घेण्यात आलेल्या व्हँक्सीन डोस लसीकरण शिबिरात गुहागर तालुक्यातील आय काँग्रेसच्या एका स्मार्ट पदाधिकाऱ्याने आरोग्य सेवकांनाच उपदेशाचे डोस पाजण्याचा प्रकार केला. बाहेरुन स्वतःच्या मर्जीतील आणलेल्या माणसांना डोस न मिळाल्याने अंगाचा तिळपापड झालेल्या या पदाधिकाऱ्याने येथे सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना धमक्या देत अरेरावीची भाषा केली. त्यामुळे येथे प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेवकांनी या प्रकाराविरुध्द नाराजी व्यक्त केली.पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात 13 जुलै रोजी व्हँक्सीनचे लसीकरण शिबीर केवळ शृंगारतळी कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी घेण्यात आले होते.
या दरम्यान, शृंगारतळी स्मार्ट सीटीतील या स्मार्ट पदाधिकाऱ्याने लसीकरणासाठी आपल्या मर्जीतील माणसे शिबिर ठिकाणी बोलावली. त्यांना लस मिळावी, असा आग्रह या पदाधिकाऱ्याने आरोग्यसेवकांजवळ धरला. मात्र, हे लसीकरण केवळ शृंगारतळी वासियांसाठीच असल्याचे त्याच्या निदर्शनास आणूनसुध्दा हा पदाधिकारी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने आरोग्य सेवकांना अरेरावी करुन उध्दटपणे वागण्यास सुरुवात केली. त्याच्या या उध्दट वागण्याने शिबिराच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. या पदाधिकाऱ्याने सोशल डीस्टींगचे नियमही पायदळी तुडविले. या पदाधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी लसीकरणावरुन वाद घातला होता.यावेळी मी पत्रकार आहे, माझे कोणीही काहीही करु शकत नाही, अशी दमदाटी केल्याची तेथे चर्चा होती. या प्रकारानंतरच पुन्हा एकदा या पदाधिकाऱ्याने शृंगारतळीतील शिबिरात गोंधळ घातल्याने आरोग्यसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापदाधिकाऱ्याने केलेल्या कृत्याचा पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून या पदाधिकाऱ्याला योग्य ती समज देण्यात आलेली असून यापुढे असा प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे .