गुहागर – गुहागर तालुक्यात 2 वर्षापूर्वी झालेल्या बिबट्याच्या कातडी तस्करी प्रकरणानंतर दोन दिवसांपूर्वी उजेडात आलेल्या वाघ नखांच्या तस्करी प्रकरणाने वन्य प्राण्यांच्या शिकारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी खवले मांजर तस्करीची प्रकरणेही समोर आली होती. वारंवार घडणाऱ्या या प्रकरणांमुळे गुहागर हे पर्यटकांचे नव्हे तर तस्करींचे माहेरघर झाल्याची प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
गुहागर तालुका हा निसर्गरम्य व घनदाट वृक्षराजीने नटलेला आहे. मात्र, अलिकडे विकासाच्या नावाखाली होणारी वाढती वृक्षतोड त्यामुळे येथील वनसंपदा नष्ट होत आहे. त्यातच शिकारीचा जणू शापच मिळालेला आहे. गुहागर हे शिकारीचे जणू हक्काचे ठिकाणच अशीच शिकाऱ्यांची समज झाली आहे. गुहागर तालुका डोंगराळ व दुर्गम भाग, जंगले असल्याने शिकाऱ्यांना संपूर्ण माळरान शिकारीसाठी मोकळेच असते. यापूर्वी कितीतरी हौशे-नवशे गुहागरमध्ये पर्यटनाला येण्याच्या निमित्ताने शिकारीसाठी तळ बसलेले आढळून आलेले होते. मात्र, यांच्यावर कुणाचीही नजर नाही. गुहागर तालुक्यात असे काही फार्महाऊस आहेत की, तेथे बाहेरील बड्या शिकाऱ्यांची ऊठ-बस असते. याला काही प्रमाणात राजकीय वरदहस्तही आहे.
काही वर्षापूर्वी राज्याच्या एका माजी परिवहन मंत्र्याने तर गुहागरमध्ये येऊन आपल्या शिकारीचा धर्मच पाळला होता. दोन वर्षांपूर्वी वडद येथे दोन शिकाऱ्यांना पकडण्यात आले होते. तसेच यापूर्वी खवलेमांजर तस्करीप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी बिबट्याच्या कातडे तस्करी व विक्रीप्रकरणाने संपूर्ण गुहागर तालुक्यात शिकारीचा प्रश्न गंभीर बनला होता. या बिबट्याच्या कातडीची वाहतूक गुहागरमधील एका ट्रँव्हल्स बसमधून करण्यात आली होती व विक्री पालघर जिल्ह्यातील वालीव येथे करण्यात आली होती. या प्रकरणात गुहागरमधील दोघेजण असल्याने कातडी तस्करीचे कनेक्शन गुहागर असल्याचे व बिबट्याची शिकार येथेच झाल्याचा संशय गुहागर असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. आता पुन्हा एखदा वाघ नखांची तस्करी व विक्री प्रकरणाने गुहागर तालुक्यात खळबळ उडाल्याने अशा शिकारी गुहागरमध्येच होत असल्याचा संशय पुन्हा एकदा बळावला आहे.
वारंवार घडणाऱ्या तस्करी व शिकारीमुळे केवळ गुहागर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात वन्य प्राण्यांची शिकार व त्यांच्या अवयवांची होणारी तस्करी यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी दापोली व चिपळूण येथेही अशी प्रकरणे पुढ़े आली होती. यांवर कारवाईही झाली होती मात्र, या सर्व कारवाई मलमपट्टी ठरत असल्याचे वारंवार घडत असलेल्या प्रकरणांवरुन दिसून येत आहे. जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीला चाप बसावा व तस्करी करण्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.