भारतात संस्कृती, परंपरा व पुराणाला अधिक महत्त्व आहे. देशात शेकडो तीर्थस्थळे आहेत. दररोज कोटय़वधी भाविक विविध मंदिरात जाऊन देवदर्शन करत असतात. आपल्या देशात शिवशंकराची अनेक मंदिरे आहेत. मात्र, पांडवांनी वनवासात असताना अनेक शिवमंदिरांची उभारणी केली आहे. या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्त मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात. जाणून घेऊया पांडवकालीन शिवमंदिरांविषयी.
ममलेश्वर महादेव मंदिर : पांडवांनी वनवासातील काही काळ हिमाचल प्रदेशमध्ये व्यतीत केला होता. या कालावधीत पांडवांनी हे शिवमंदिर बांधले असून, हे मंदिर सुमारे ५ हजार वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात २०० ग्रॅम वजन असलेला गव्हाचा दाणा आणि भीम ढोल उपलब्ध आहे. या मंदिरात एक धुनी असून, महाभारत काळापासून ती प्रज्वलित असल्याची मान्यता आहे.
कालीनाथ शीव मंदिर : हिमाचल प्रदेशमधील कांगडा घाट येथे कालीनाथ महाकालेश्वर शीव मंदिर आहे. लाक्षागृहातून सहीसलामत बाहेर पडल्यानंतर पांडवांनी या शीव मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरातील शिवलिंग दिवसागणिक खचत चालले आहे. उज्जैन येथील महाकाल मंदिरानंतर कालिनाथ मंदिर हे एकमेव मंदिर आहे, जेथे गर्भगृहात ज्योतिर्लिगाची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिरात महादेवासह महाकालीचा वास असल्याची मान्यता आहे.
गंगेश्वर महादेव मंदिर : गंगेश्वर महादेव मंदिर दीवपासून ३ किमी अंतरावर असलेल्या फुडम या गावात आहे. गंगेश्वर म्हणजे जटांमध्ये गंगा देवीला धारण केलेला शंकर. हे एक अद्भुत मंदिर आहे. हे मंदिर समुद्र किनारी असलेल्या एका गुहेत असून, समुद्राच्या लाटा मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करत राहतात. या मंदिरात पाच शिवलिंग असून, पांडवांनी वैयक्तिक पूजेसाठी स्थापन केली आहेत.
भयहरण महादेव मंदिर : भयहरण महादेव मंदिराची उभारणी पांडवांनी अज्ञातवासात असताना केली. हे मंदिर उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात आहे. नावाप्रमाणे भीती आणि संकटे दूर करण्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिर परिसरात शंकरासह, हनुमान, शिव-पार्वती, संतोषी माता, राधा-कृष्ण, विश्वकर्मा, बैजूबाबा यांचीही मंदिरे आहेत. महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांची तोबा गर्दी होते.
लोधेश्वर महादेव मंदिर : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात लोधेश्वर मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराची उभारणी पांडवांनी अज्ञातवासात असताना केल्याची मान्यता आहे. व्यास ऋषींच्या सांगण्यावरून पांडवांनी या मंदिरात महारूद्राचा महायज्ञ केला होता. महाशिवरात्रीनिमित्त देशाच्या कानाकोप-यांतून भाविक दर्शनासाठी या मंदिरात येतात. प्रामाणिकपणे केलेला नवस पूर्ण होतो, अशी मान्यता आहे.
पडीला महादेव मंदिर : उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे या मंदिराची उभारणी करण्यात आली असून, पांडेश्वर महादेव मंदिर या नावानेही हे मंदिर प्रसिद्ध आहे. अंग आणि मगध देशाच्या यात्रेवर असताना भारद्वाज ऋषींमुळे पांडवांनी हे शिवलिंग स्थापन केल्याचे सांगितले जाते. हे सिद्धपीठ मंदिर असून, या मंदिरातून भाविक कधीच निराश होऊन जात नाहीत.
लाखामंडल महादेव मंदिर : डेहराडूनपासून १२८ कि.मी. अंतरावर असलेल्या यमुना नदीच्या तटावर लाखामंडल मंदिर उभारण्यात आले आहे. लाक्षागृहातून बाहेर पडल्यानंतर खूप दिवस पांडवांनी येथे वास्तव्य केले होते. या वास्तव्यादरम्यान पांडवांनी हे मंदिर बांधले आहे. या मंदिरात दोन शिवलिंग असून, दोघांचा रंग वेगळा आहे. एका पर्वतावर पार्वतीच्या पाऊलखुणा असल्याचे दिसून येते. महाशिवरात्रीच्या दिवशी जो भाविक या मंदिरात येऊन दर्शन घेतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.