मायकोबॅक्टेरियम ट्य़ुबरक्युलोसिस नावाच्या विषाणूमुळे टीबी हा रोग होतो. सामान्यपणे टीबीचा प्रादुर्भाव फुप्फुसांमध्ये होतो असे समजले जाते पण तो मेंदू, सांधे आणि अन्य इंद्रियांनाही होतो. या रोगाला कारणीभूत ठरणारे जीवाणू हवेवाटे प्रवास करतात. टीबी झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणारी हवा त्याच्या संपर्कातील व्यक्तीने श्वासावाटे आत घेतल्यास त्याच्या शरीरात टीबीला कारणीभूत ठरणारे जिवाणू शिरतात. अर्थात ज्या व्यक्तीला टीबी झाल्याचे निदान त्याच्या थुंकीची तपासणी करून पक्के झालेले आहे. अशा व्यक्तीच्या संपर्कात असलेल्यांनाच टीबीचा प्रादुर्भाव होतो.
दोन आठवड्य़ांहून अधिक काळ टिकणारा खोकला पुनःपुन्हा होणे, काहीवेळा खोकल्यातून रक्त पडणे, छातीत वारंवार दुखणे, थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, थंडी वाजणे, ताप येणे आणि रात्री घाम येणे ही या रोगाची लक्षणे आहेत. अर्थात अन्न किंवा पाण्यातून, त्वचेचा संपर्क आल्यास, रुग्णाच्या वस्तूला स्पर्श झाल्यास (टॉयलेट सीट्स) किंवा अगदी एकाचा टूथब्रश दुसऱ्याने वापरल्यासही टीबीचा संसर्ग होत नाही हे लक्षात ठेवायला हवे.