महाराष्टातील प्रसिद्ध असे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ. इथल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील मूर्ती स्वयंभू असल्याची मान्यता आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि त्यातील गणपतीचे विलोभनीय मंदिर असे एकूणच निसर्गरम्य वातावरणातील धार्मिक ठिकाण येथे पहावयास मिळते. डोंगराच्या बाजूलाच असलेल्या स्वयंभू गणेशमूर्तीला प्रदिक्षणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगरालाच प्रदक्षिणा घालावी लागते. हा प्रदक्षिणा मार्ग सुमारे एक किलोमीटर एवढा आहे. ह्या प्रदक्षिणा मार्गात येणाऱ्या समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीची झाडे असे निसर्गरम्य दृश्य पहावयास मिळते.
मुंबई- गोवा महामार्गापासून जवळ तर रत्नागिरीपासून गणपतीपुळे २४ कि.मी. अंतरावर असून मुंबई, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर इ. शहरातून थेट एस.टी. बस सेवा पुरविली जाते. तिथे राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृहही आहे.


















