चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मिरजोळी दत्तवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात माती उत्खनन होत असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती येऊन अपघात होण्याची शक्यता आहे. हे बेकायदेशीररित्या केले जाणारे उत्खनन नक्की कोणाच्या आशीर्वादाने होत आहे ? आणि प्रशासन का डोळेझाक करत आहे ? याबाबत सध्या या परिसरात एकच चर्चा सुरू आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. हे उत्खनन बेकायदेशीर असून त्याची परवानगी ग्रामपंचायतीकडून घेतली आहे का? असा सवाल ग्रामस्थ पंकज फागे यांनी उपस्थित केला असून संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबतचे निवेदन ग्रामस्थ पंकज फागे यांनी ग्रामपंचायतीला दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मिरजोळी दत्तवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या निदर्शनास ही बाब आणूनही सरपंच कासम दलवाई यांनी कोणतीही चौकशी केलेली नाही. शिवाय त्यांना दिलेल्या निवेदनाचे उत्तरही त्यांनी दिलेले नाही. अशा बेकायदेशीर कामांना सरपंच महाशय पाठीशी घालत नाहीत ना? संबंधित ठेकेदाराशी या सरपंच महाशयांचे लागेबंध आहेत की काय? असा सवालही श्री. फागे यांनी उपस्थित केला आहे.माती उत्खनन असेच सुरू राहिले तर भविष्यात याठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. अनधिकृतपणे माती उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या सरपंच महाशयांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी पंकज फागे यांनी केली आहे.