गुहागर – नियती खूप क्रूर असते. व्यक्तीला कधी भरभरुन
देते व एकदाच काढूनही घेते. संपूर्ण कुटुंबच उध्वस्त करते. कोरोना ही आपत्ती असली तरी त्याने होणारे मृत्यू निमित्त ठरत आहेत. हा सारा नियतीचा खेळ असून याची अनेक उदाहरणे आज कोरोना आपत्तीत घडून येत आहेत. गुहागर तालुक्यातील चिखली येथील वडील-मुलाचा एकाच दिवशी झालेला मृत्यू हा नियतीनेच घातलेला घाला असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबच निराधार झाले आहे.
चिखली बौध्दवाडी येथील प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व चिखली रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुरेश महादेव गमरे यांचे कोरोनाने दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचा विवाहित मुलगा सूरज यालाही कोरोनाची लागण झाल्याने हे दोघेही कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत होते. मात्र, सकाळी वडिलांचा तर संध्याकाळी मुलाचा अशा दोघांचाही उपचारादरम्यान, मृत्यू झाला. सुरेश गमरे हे रिक्षाचालक. चिखली कारुळ फाट्यावर त्यांचा गेली 20 वर्षे रिक्षा व्यवसाय होता. यातूनच ते आपल्या कुटुंबाची गुजराण करायचे. चिखली ग्रामपंचायतीचे ते सदस्यही होते. गावाच्या विकासासाठी ते नेहमी धडपड करायचे. गावामध्ये कोणत्याही वाडीत सार्वजनिक सत्यनारायण पूजा किंवा एखादा कार्यक्रम असला तरी जात, भेद न ठेवता आलेल्या निमंत्रणाला मान देऊन त्यामध्ये ते सहभागी व्हायचे. सुरेश गमरे यांचा वृध्द आई, पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा सूरज हा नोकरीनिमित्त दुबईला होता. मात्र, गेल्यावर्षी कोरोना आपत्तीपासून तो गावीच होता. त्याचा 6 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. कुटुंबाचा सारा भार वडील व मुलग्यावर असतानाच नियतीने घातलेला हा घाला संपूर्ण चिखली गावाला धक्का देणारा ठरला आहे. गावाच्या संपूर्ण विकास प्रक्रियेत सुरेश गमरे यांचे योगदान मोलाचे ठरले मात्र, कोरोना आजाराने त्यांचा बळी गेला. वडील गेले पण कमावता मुलगाही या कुटुंबाने गमावला.
- पाणी योजनेचे स्वप्न पूर्णत्वास
चिखली गावातील काही वाड्यांना पाण्याची मोठी झळ बसते. याकरीता ग्रामपंचायत स्तरावर पाणी योजना राबविण्याची सुरेश गमरे यांचे स्वप्न होते. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले आणि पाणी योजना मार्गी लागली. याचे
श्रेय त्यांना जात असून त्यांचे स्मरण म्हणून पाणी योजनेच्या विहीर किंवा साठवण टाकीला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ संदीप मांडवकर यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.