रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असलेले पहावयास मिळत आहे. अजूनही अनेकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक नागरिक फिरताना दिसत आहेत. पण आता परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. ३१ मार्च २०२१ रोजी पर्यंत कोरना मुळे मृत पावलेल्यांची संख्या ३७६ इतकी होती तर मागील ३५ दिवसात यामध्ये तब्बल ३६२ मृतांची भर पडली आहे. मागील वर्षभरात जितके मृत्यू झाले तितकेच मृत्यू मागील ३५ दिवसात झाल्याचे शासकीय आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे.
३१ मार्च २०२१ पर्यंत कोरना बाधित रुग्णांची संख्या ११०२९ इतकी होती. यामध्ये मागील ३५ दिवसात १३८२० रुग्णांची भर पडली आहे. म्हणजेच मागील वर्षभरातील रुग्णसंखे पेक्षा जास्त रुग्ण हे मागील ३५ दिवसात सापडले आहेत. जिल्ह्यासाठी हे आकडे चिंताजनक असून कोरोना नियमावलीचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात संचारबंदी असूनही नागरिकांचा मुक्त संचार सुरूच असल्याचे दिसत आहे.