गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमार समाजाचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून त्यांच्या उपजीविकेचे हे एकमेव साधन त्याच्यावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मासेमारीसाठी बोट घेवून खोल समुद्रात गेल्यावर १५ -१५ दिवस पलट असते. बहुतांश मच्छिमार हे मुंबई, रायगड, ठाणे, या ठिकाणी समुद्रात मासेमारीसाठी लॉकडाऊन कालावधी पूर्वीच गेलेले आहेत.
परंतु या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मच्छिमार बांधवाना सद्यस्थितीत काही कामधंदा व रोजगार नसल्याने व शहर ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना आपल्या गावात येण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या सर्वाना गावी येणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना समुद्रमार्गे गावी येण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी केली आहे.
गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन कालावधीत गुहागर तालुक्यातील काही मच्छिमार (खलाशी) समुद्रमार्गे त्यांच्या गावी परतत असताना त्यांच्या बोटी मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे सध्या त्यांच्या मनात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण आहे.सद्यस्थितीत रस्त्यावरील प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना आपल्या मूळगावी समुद्रमार्गे येवून जिल्ह्यातील प्रमुख बंदरावर उतरण्याची व त्यांच्या गावापर्यंत प्रवास करण्यासाठी आपल्या स्तरावरून परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली आहे.