गुहागर – लग्न ठरलं मात्र नवरदेव स्वत: कोरोनाबाधित आहे असे माहीत असताना सुधा ते लपवून ठेवून बोहल्यावर उभा राहीला. त्यामुळे 23 जणांना गृहविलगीकरण्यात आले असून वऱ्हाडी मंडळीला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे अशी ही धक्कादायक घटना गुहागर तालुक्यातील शीर या गावी घडली.
गुहागर तालुक्यातील सडेजांभारीतील मुलाचे लग्न शीरमधील मुलीबरोबर ठरले होते. हा विवाह 5 मे रोजी होता. विवाहासाठी प्रांताकडून परवानगीही घेतली होती. त्यातील अटींप्रमाणे वधुवराकडील मंडळींनी आबलोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात 4 मे रोजी कोरोना तपासणी केली.
प्रांताच्या परवानगीची एक प्रत शीर ग्रामपंचायतीला प्राप्त झाली होती. आपल्या गावात कोरोनाचा प्रार्दुर्भाव होवू नये म्हणून सजग असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने वधुकडील मंडळींचे कोरोना तपासणी अहवाल आधीच तपासले होते. 5 मे रोजी शीरचे सरपंच विजय धोपट, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत पवार, तलाठी बी. एच. राठोड, ग्रामसेवक एकनाथ पाटील, पोलीस पाटील संदिप घाणेकर आदी विवाहस्थळी गेले. वरपक्षाकडे कोराना तपासणीचा अहवाल मागितला. वरपक्षाने आम्ही तपासणी केली आहे मात्र रिपोर्ट आणले नाहीत असे सांगितले. विवाहसोहळ्यात विघ्न नको म्हणून प्रशासनाने अधिक चौकशी केली नाही. प्रांताच्या आदेशाप्रमाणे विवाह पार पाडा. अशा सूचना करुन ते परतले. वरपक्षाकडील कोरोना चाचणीची खातरजमा व्हावी म्हणून तलाठी, ग्रामसेवक यांनी आबलोली प्राथमिक केंद्रात चौकशी केली. त्यावेळी नवरा कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.
त्याच वेळी मात्र प्रशासकीय पथक विवाहस्थळी दाखल झाले आणि या पथकाने वरपक्षाकडे चौकशी सुरु केली. दाखल्यांची मागणी होवू लागली. अखेर वराने आपण कोरोनाबाधित असल्याची कबुलीच पथकाला दिली. ही धक्कादायक बाब उघड होताच शासकीय पथकाने 50 हजाराची दंडात्मक कारवाई केली. व नवरदेव कोविड 19 पॉझिटिव्ह असल्याने साथ रोग नियंत्रण प्रसाराबद्दल’ असा उल्लेख करत 50 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. तसेच नवरा मुलगा कोरोनाबाधित असल्याने सर्वांना तातडीने गृहविलगीकरणात जाण्याच्या सक्त सुचना दिल्या. या कारवाईनंतर नवरदेव कोरोनाबाधित असतानाही शीरमधील मंडळींनी वधुची सासरी पाठवणी केली आहे. सध्या नवरदेवासह सर्वजण गृहविलगीकरणात रहात आहे.