गुहागर – ( विशेष प्रतिनिधी ) – साहेब मला कोरोना झालाय पण माझ्यामुळे माझ्या अडीज वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागन होऊ नये यासाठी मला उपचारासाठी रूग्णालयात भरती करा अशी विनंती सध्या मुंबई मधील धारावीमध्ये राहणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील एका तरूणाने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना केली. त्यानंतर आमदार जाधव यांनी तत्काळ आपली यंत्रणा कामाला लावून त्या कोरोनाग्रस्त रूग्णाला रूग्णालयात दाखल केले.
मुंबई मधील धारावीच्या झोपडपट्टीत राहणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील एका तरूणाने नुकतीच खासगी रूग्णालयात चाचणी केली. त्या केलेल्या चाचणीत कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर तो व त्याच्या घरातील लोक घाबरले. ही माहिती शेजारच्या लोकांना समजली तर तेही घाबरतील. भितीने कोणी मदत करणार नाही. त्यामुळे संबंधित कोरोनाग्रस्ताने तरुणाने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना फोन केला.आणि साहेब मला कोरोना झाल्यामुळे माझ्या घरचे लोक प्रचंड घाबरले आहेत. सर्वजण तणावाखाली आहेत. ही गोष्ट मी शेजारच्या लोकाना सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मला मदत करून कोणत्याही रूग्णलयात दाखल करा. मला अडीज वर्षाचा मुलगा आहे. माझ्यामुळे त्याला कोणताही त्रास होता कामा नये अशी विनंती त्याने आमदार जाधव यांना फोनवरून केली. आमदार जाधव यांनी संबंधित कोरोनाग्रस्त तरूणाकडून तो राहत असलेल्या झोपडपट्टीचा पत्ता लिहून घेतला. त्यानंतर तत्काळ धारावीमध्ये राहणार्या आपल्या कार्यकर्त्यांला रूग्णवाहिकेसह त्याच्या घरी पाठवून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्या घरच्या लोकांची चाचणी घेवून त्यांनाही होमक्वारंटाईन करण्याची व्यवस्था जाधव यांनी केली. त्यामुळे कोरोनाग्रस्त त्या रूग्णांच्या कुटूंबियांनी आमदार जाधव यांचे आभार मानले.