बातम्या शेअर करा

दाभोळ – 50 दिवसांपूर्वी दापोली तालुक्यातील नवसे येथे घडलेल्या संशयित गोहत्या प्रकरणातील तिघा आरोपींना शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आले गुहागर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईची चर्चा दापोली सह संपूर्ण रत्नागिरी जिल्यात सुरू आहे. त्यावेळी घटनास्थळी पाठवलेल्या मांसाच्या नमुन्यांचा अहवाल पुणे प्रयोगशाळेतून अद्यापही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे दिड महिन्यानंतरही ते मांस नेमके कोणत्या जनावराचे याचे गुढ उकलू शकलेले नाही.

नवसे येथील या प्रकरणी हुजूर नाखवा ,शफाकत मुजावर व आरिफ मुरूडकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम 429 व प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960चे कलम 11 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवसे गावालगतच्या जंगलात 11 मे च्या रात्री गोवंश वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार दाभोळ सागरी पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी रात्री नवसे जंगलानजीक पोहोचले. मात्र पहाटे 5 वाजेपर्यंत पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा लागला नाही. मात्र 14 मे रोजी सकाळी अज्ञात प्राण्याचे मांस असलेली पिशवी दाभोळ समुद्रकिनारी लागली होती. सागरी पोलीसांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्या मांसाचा पंचनामा करून नमुने दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासण्यासाठी आणले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱयांनी ते मांस अज्ञात मोठय़ा प्राण्याचे असल्याचे सांगून पुढील परीक्षणासाठी पुण्यात पाठवले होते. मात्र दीड महिना झाला तरीही त्या सॅम्पलचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
मात्र याच दरम्यान या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी दाभोळ पंचक्रोशीतील नागरिकांकडून होत होती. मात्र दाभोळ सागरी पोलीस स्थानकामधून कारवाई होत नसल्याने जागरूक नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांची भेट घेऊन संशयित गोहत्येचा प्रकार निदर्शनास आणून दिला. या तक्रारीची दखल घेऊन डॉ. मुंडे यांनी तपासाची सूत्रे गुहागर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्याकडे दिली.

अरविंद बोडके व त्यांच्या सहकाऱयांनी तपासाला सुरूवातही केली. त्यानंतर योग्य ती चौकशी केल्यानंतर 2 जुलै रोजी वरील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना दाभोळ सागरी पोलीस स्थानक लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अरविंद बोडके यांनी केलेल्या या कारवाईमुळे त्यांचे अभिनंदन आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here