कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एव्हाना विळखा घट्ट केला आहे..या लाटेत गेल्या वेळीपेक्षा मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढत आहे. आणि हीच सर्वात गंभीर बाब आहे. एव्हाना हे ही स्पष्ट झाले आहे की कोरोनावर निश्चित औषध जरी सापडले नसले तरी लस हा कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी बराचसा प्रभावी मार्ग आहे. आत्तापर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांना असलेली लसीकरणाची परवानगी आता १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे १ मे नंतर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणे हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ग्रामीण भागाचा विचार केल्यास इथेच ग्रामपंचायतीच्या भूमिकेला आणि प्रत्यक्ष कृतीला जास्त महत्व आहे.
आपल्याकडे मतदानाचा अधिकारही १८ वर्षावरील सर्व नागरिकांना आहे, म्हणजेच प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारयादी हे आधारभूत कागदपत्र समजता येवू शकते. एखाद्या गावामधील मतदारयादीच्या संख्येपैकी प्रत्यक्ष गावात वास्तव्य करणारे किती याची सर्वप्रथम नोंद करुन यादी तयार करावी लागेल. कारण काही जणांची नावे अजून गावाकडच्या मतदारयादीत आहेत पण प्रत्यक्षात ते नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई पुण्यासारख्या शहरात स्थलांतरीत झाले आहेत. प्रत्यक्ष संख्या निश्चित झाल्यावर त्याची विभागणी ग्रामपंचायतीच्या प्रभागश: करावी लागेल. म्हणजे प्रत्येक प्रभागात नक्की लाभार्थी किती आहेत ते समजेल. हे काम झाले की आपल्या गावाला नक्की किती लसींची गरज आहे त्याचा डाटा तयार होईल. त्यानंतर यापैकी किती जणांनी यापूर्वीच पहिला डोस घेतला आहे याची यादी करावी लागेल. तसेच यापैकी कितीजण मधुमेह, उच्च रक्तदाब आदी व्याधींनी ग्रस्त आहेत त्याचा सर्व्हे करावा लागेल जेणेकरुन आलेल्या लसींनुसार त्याचा प्राधान्यक्रम ठरवता येईल. ही सर्व कामे जर ३० एप्रिल पूर्वी पूर्ण केली तर ज्या दिवशीपासून लसीकरणाची सर्वांसाठी सुरुवात होईल त्यादिवशी ग्रामपंचायतीला आरोग्य अथवा संबधित यंत्रणेकडे नक्की लसींच्या संख्येची मागणी नोंदवता येवू शकेल. कारण १ मे ला सर्वांसाठी लसीकरण खुले झाल्यानंतर लगेचच मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होतील याची शक्यता खूपच कमी आहे. त्यावेळी जर आपला डाटा स्ट्रॉंग असेल तरच आपल्याला योग्य प्रकारे मागणी नोंदवता येईल.
लस उपलब्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या प्रत्येक प्रभागात लसीकरणाची व्यवस्था करावी, एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त वाड्या येत असल्यास प्रत्येक वाडीला वेळ विभागून दिल्यास एकाच वेळी गर्दी होणार नाही.
या सर्व विषयांसाठी गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेवक, प्राथमिक- माध्यमिक शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांची मदत घेता येवू शकते. यापैकी जर कोणी आज रोजी गावात हजर नसतील तर त्यांना गावात हजर राहण्याचे आदेश ग्रामपंचायत स्तरावर देण्यात यावेत. या सर्वांचे योग्य नियोजन आणि समन्वय करण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी तलाठी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्या मदतीने प्रयत्न करावेत. या सर्वांच्या सहकार्याने येत्या ३० एप्रिलपर्यंत लसीकरणाबाबत जनजागृती करावी. लसीकरण हे वैयक्तिक इच्छेवर अवलंबून न ठेवता गावातील १०० % पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. या सर्व कामाची अंमलबजावणी करण्यावर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी विशेष लक्ष द्यावे.
अशा प्रकारे योग्य नियोजन करुन प्रत्येक गाव स्तरावर लसीकरण मोहीम योग्य प्रकारे राबविल्यास कोरोनामुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात होईल.
विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते ज्याप्रमाणे आपापल्या उमेदवाराला मतदान करुन घेण्यासाठी प्रयत्न करतात तसेच किंबहुना त्याहून जास्त प्रयत्न त्यांचेकडून याकामी अपेक्षित आहेत.
आज आपण ज्या टप्प्यावर येवून उभे आहोत तिथून आपल्याला केवळ लसीकरण आणि स्वत:ची काळजी ( कोरोना निर्बंधांचे पालन) या दोनच गोष्टी वाचवू शकतात हे लक्षात घेवून सर्वांनी प्रयत्न केले तर आणि तरच कोरोनामुक्त दिवसाचा सूर्योदय पहायला मिळेल.
निबंध कानिटकर