चिपळूण ; ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला म्हणून उपसभापती पद दिलं नसेल तर असले पद छप्पन वेळा सोडेन–राकेश शिंदे

0
494
बातम्या शेअर करा

चिपळूण (प्रतिनिधी) -चिपळूण तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या कादवड ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय कौशल्य आणि भवितव्य पणाला लावुन शिवसेनेचे सरपंच उपसरपंच बसवले. ग्रामपंचायतीवर डौलाने भगवा फडकवला आपल्यासाठी हे खूप अभिमानास्पद आहे.मात्र याच कारणामुळे उपसभापती पद नाकारले असेल तर असले पद एकदाच काय छप्पन वेळा सोडेन अशा रोखठोक शब्दात चिपळूण पंचायत समितीचे गटनेते राकेश शिंदे यानी आपल्या भावना शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांना पाठवलेल्या पत्रात मांडल्या आहेत.त्यानी हे पत्र खा.राऊत याना वॉटसप आणि मेल केलं आहे.

चिपळूण तालुक्यातील शिवसेनेत चाललेल्या मनमानी आणि कुरघोडीच्या राजकारणावर पक्षातील एका लोकप्रतिनिधीने थेट पक्ष सचिवांचे लक्ष वेधले आहे.या पत्रामुळे शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आली असून आगामी काळात याचे मोठे पड़साद उमटण्याची शक्यता राजकिय वर्तुळात व्यक्त होत आहे.खा. राऊत याना लिहलेल्या पत्रात राकेश शिंदे यानी आपली नाराजी स्पष्ट शब्दात मांडली आहे.आज उपसभापती पदासाठी गटनेता म्हणून आपण दावेदार होतो.गेली चार वर्षे या पदाला योग्य तो न्याय आपण दिला.पण या पदासाठी आज चक्क लेखी आदेश आला?असे यापूर्वी कधीही घडलेले नाही.कादवड ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत ५ सदस्य तर शिवसेनेचे २ सदस्य निवडून आले.असे असताना विरोधी गटाच्या २ सदस्याना विश्वासाने शिवसेनेत आणुन आपण ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या झेंड्याखाली आणली.हे सत्तांतर झाल्यावर राष्ट्रवादीकडुन आपल्याला उपसभापती पद मिळू नये अशी फ़ील्डिंग लावण्यात आली.वृत्तपत्रातून तश्या बातम्या सतत येत होत्या. असे असताना राष्ट्रवादीला आणि पक्षातील काहीना खुश करण्यासाठीच आपल्याला डावलले गेले काय?हे सत्तांतर वरिष्ठ मंडळीना रुचले नाही काय?असा प्रश्न विचारताना नापास केल्याचे दू:ख नाही पण परीक्षाच घेतली नाही ही आमची वेदना आहे असे शिंदे यानी म्हटले आहे.आपण जे केलं ते पक्षासाठीच केलं पण पक्षाचे सचिव म्हणून आपण पाठवलेल्या आदेशाने राष्ट्रवादी यशस्वी झाली.”आजी माजी आमदार दुर्लक्षित चिपळूणची शिवसेना चालवतोय कोण” हा वृत्तपत्रातून येणारा सवाल या निमीत्ताने गडद होतोय असेही राकेश शिंदे यानी म्हटले आहे. मागच्या वर्षी चिपळूण पंचायत समितीत महाविकास आघाडी केली तेव्हाही गटनेता म्हणून मला अथवा माझ्या सहकारी सदस्याना कुठेही विश्वासात घेतले नाही.सभापती पदाचा उमेदवारही परस्पर ठरवला गेला.आता यावेळी सुद्धा तेच राजकारण झालं.आपण देखील पक्षाचे लोकसभेत गटनेते आहात मग हे पद एवढं खुजं आहे का?असा खडा सवाल ही राकेश शिंदे यानी खा.राऊत याना विचारला आहे.म्हातारी मेल्याचे दू:ख नाही पण काळ सोकावता कामा नये हिच आपली भुमिका आहे. आमदार भास्करराव जाधव,माजी आमदार सदानंद चव्हाण आणि पंचायत समिती सदस्य अशी संयुक्त बैठक घेतली असती तर चिपळूण पंचायत समितीवर गतवर्षीच भगवा फडकला असता पण आपले काही उत्साही पदाधिकारी महाविकास आघाडीसाठी खुपच उताविळ झाले होते असा चिमटा शिंदे यानी काढला आहे.खासदार म्हणून आपले दौरे सुद्धा कार्यकर्त्याना कळत नाहीत.निलेश राणेंचा निषेध करायला जे कार्यकर्ते आपल्या प्रेमापोटी रत्नागिरीपर्यंत हजारोंच्या गर्दीत जातात त्या कार्यकर्त्याना इथे मात्र आपली भेट होत नाही.पक्षातल्या या “सोशल डिस्टन्सींग”वरही शिंदे यानी बोट ठेवले आहे.सगळे उच्च पदस्थ शहरात असल्यामूळे आपल्या भेटीत पक्ष संघटनेतील अडचणी समोर न येता राष्ट्रीय महामार्गाच्या अडचणी अधिक मांडल्या जातात.पक्षाचा कणा असलेल्या ग्रामीण भागातील पाणी टंचाईची व्यथा कोण मांडत नाहीत.आपण याचा विचार कराल अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली आहे.असे म्हणतात ज्या भुईमूगाला पाला जास्त तिथे शेंगा कमी असतात.आपण ग्रामीण भागातला कडवट शिवसैनिक आहोत जिथे शेंगा जपल्या जातात पणआज कळलं वरिष्ठ भुईमुगाचा पाला पाहुन खुश होतात असा मार्मिक टोलाही राकेश शिंदे यानी पत्रात शेवटी लावला आहे.एकुणच या रोखठोक पत्रातील ‘सच्चाई’ मुळे चिपळूण तालुका शिवसेनेत असलेली अंतर्गत नाराजी समोर आली असून नजिकच्या काळात पक्षात संस्थानिक झालेले पदाधिकारी आणि निष्ठावंत सैनिक यांच्यातील ” सामना ” जोरदार रंगण्याची चिन्हे आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here