खेड – मुंबई-गोवा महामार्गावरील अवघड कशेडी घाटाला पर्याय म्हणून तयार करण्यात येत असलेल्या कशेडी बोगद्याचे काम प्रगतीपथावर असले तरी हा बोगदा पुर्ण होण्यास २०२२ साल उजाडण्याचे संकेत ठेकेदार कंपनीने दिले आहेत. कशेडीचा डोंगर पोखरून तयार करण्यात येत असलेल्या या बोगद्यामुळे १८ किलोमीटरचा कशेडी घाट केवळ १० मिनिटात पार करता येणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा चालकांसाठी कसोटीचा घाट मानला जातो. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हद्दीत ११ किलोमिटर तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात ७ किलोमिटर म्हणजे तब्बल १८ किलोमिटरचा हा घाट असून सद्यस्थितीत हा घाट पार करण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागतो.
नागमोडी वळणांचा हा घाट चढताना आणि उतरताना चालकांकडून जरा जरी चुक झाली सरी जिवघेणा अपघात हा ठरलेलाच. त्यामुळे महामार्ग क्रमांक ६६ वरील हा घाट चालकांच्या उरात चांगलीच धडकी भरवणारा आहे. पावसाळ्यात या घाटात वारंवार दरड कोसण्याचे प्रकार घडतात त्यामुळे पावसाळ्यात तर घाट अधिकच धोकादायक बनतो. अतिवृष्टीदरम्यान रस्त्यावर दरड कोसळली तर दोन्ही बाजूची वाहतुक खोळंबते आणि प्रवाशांना वाटेतच अडकून पडावे लागते. पावसाळ्यात वारंवार उद्भवणाऱ्या या परिस्थितीमुळे वाहन चालक आणि प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल होतात.
नागमोडी वळणे आणि पावसाळ्यात दरडी कोसळून उद्भवणारी परिस्थिती यातून कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी खेड तालुक्यातील कशेडी ते पोलादपूर तालुक्यातील भोगाव दरम्यान बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रिलायन्स इन्फ्रा लिमिटेड मुंबई या कंपनीने या कामाचा ठेका घेतला असून २५ जानेवारी २०१९ रोजी कामाचे भुमिपुजन करण्यात आले होते.
खेड तालुक्यातील कशेडी ते पोलादपुर तालुक्यातील भोगाव दरम्यानचा हा बोगदा तयार करण्यासाठी ७४३.३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून सद्यस्थितीत खेड बाजूकडून बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत खेड तालुक्याच्या हद्दीतील कशेडी घाटाच्या पायथ्याशी बोगद्याचे काम वेगात सुरू असून पोलादपुर तालुक्यातील भोगाव जवळही कामाला सुरवात करण्यात आली आहे.
कशेडी घाट पोखरून तयार केला जाणारा हा बोगदा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा दुवा असून हा बोगदा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ‘माईल स्टोन’ ठरणार आहे.