वाई – (प्रवीण गाडे ) – सातारा जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख लोक स्वगृही आले आहेत. त्यापैकी शासकीय नोंदीत केवळ एक लाख 52 हजार 263 लोकच आले आहेत. त्यामुळे लॉकडाउन शिथिल होत असतानाही जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.
बाहेरच्या जिल्ह्यांतून सातारा जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण आजही कायम आहे. आतापर्यंत बाहेरच्या राज्यातून पाच हजार 119 लोक साताऱ्यात आले आहेत. तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील साधारण एक लाख 48 हजार 230 नागरिक आले आहेत. यामध्ये कोल्हापुरातून 5108, नगरमधून 1743, ठाणे 22 हजार 881, पालघर 7164, पुण्यातून 25 हजार 719, मुंबईहून 37 हजार 782, रायगडमधून 21 हजार 826, सांगली 7174, सोलापूर 4460 अशी प्रमुख जिल्ह्यांतून लोक साताऱ्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत बाहेरून आलेल्या स्थानिक नागरिकांची संख्या अशी कऱ्हाड 20 हजार 732, कोरेगाव 9,739, खटाव 15 हजार 477, खंडाळा 7,153, जावळी 9,797, पाटण 16 हजार 096, फलटण 10 हजार 745, महाबळेश्वर 8,935, माण 13 हजार 110, वाई 11 हजार 884, सातारा 29 हजार 595.