सचिन म्हटलं की आपल्या सर्वांच्या नजरेसमोर येतो तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ! पण पहिली गोष्ट म्हणजे त्यानं निवृत्त होवू नये असं निवड समितीला वाटत होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी पूरेपूर योगदान देवुन सर्व प्रकारचे मान सन्मान घेवून तो निवृत्त झाला. पण ……. मी ज्या निवड समिती बद्दल लिहतोय ती आहे शिवसेनेची आणि तो सचिन आहे सचिन कदम ! शिवसेनेचा रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम !
शिवसेना जिल्हा प्रमुख असलेला सचिन कदम कबड्डीच्या मैदानावर हजारो लोकांनी पाहिलाय. पूर्वी खेळाडू म्हणून आणि आता क्रिडा संघटक, संयोजक म्हणून. पण फार कमी लोकांना माहिती आहे की हा सचिन कबड्डीच्या आधी एक टॉपचा क्रिकेटर होता, आणि आहे. राजकिय क्रिकेटच्या मैदानात पूर्वी तो चिपळूण संघातून खेळायचा पण इथल्या संघात त्याला लय सापडली नाही. ड्रेसिंग रूममधलं वातावरण देखील म्हणावं तसं चांगलं न्हवतं. त्यामुळे त्याचा खेळ फार बहरला नाही. २००५ साली सेनेच्या निवड समितीने त्याला डच्चू देवून एका अष्टपैलुची संघात निवड केली आणि संघाचं नेतृत्वच त्याच्याकडे दिलं. हा सुदैवी खेळाडू म्हणजे सदानंद चव्हाण ! विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचा प्रथम श्रेणी किंवा पंचायत समिती जिल्हा परिषदचा रणजीचा एक सामनाही न खेळलेल्या या खेळाडूला निवड समितीने दोन विधानसभा चषकात कॅप्टन केलं आणि या पठ्यानंही संघाला दोन्ही चषक जिंकून दिले. पहिल्यांदा लढत एकतर्फी झाली तर दुसऱ्यांदा चुरशीची झाली. यावेळी पून्हा गतवेळच्या उपविजेत्या संघाशी लढत होणार आहे पण धोनी स्टाईल असलेला हा कॅप्टन कुल हॅट्ट्रीक मारणार का ? आता त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
इथल्या संघातून नगर परिषदेच्या रणजी सामन्यातुन खेळलेला सचिन गेली ७ वर्ष गुहागर संघातून खेळू लागला. कोहलीची आक्रमकता असल्याने युवा खेळाडूंना बरोबर घेवून या सचिनने शिवसेनेच्या गुहागर संघात जान आणली. जोरदार नेेट प्रॅक्टीस, छोट्या छोट्या स्पर्धा त्याने खूप गाजवल्या. फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्र रक्षणातली चपळाई यामुळे हा सचिन इथे चांगला स्थिरावला. त्याला चांगले सहकारी मिळाले. निवड समितीने विधानसभा चषकाच्या अनुशंगाने त्याला सर्व साखळी सामने खेळवले. यावेळी हा फायनल मारणार असे चित्र होते. मात्र अंतिम सामन्यात निवड समितीने या सचिनला राखीव ठेवलं. दुसऱ्या संघाच्या खेळाडूला संघात घेवून त्याला कॅप्टन केलं आणि सचिनचा बळी घेतला. नवा खेळाडू दुसऱ्या संघातून दोन विधानसभा चषक खेळून जिंकला आहे. हा देखील अष्टपैलू आहे. थोडा दुखापतग्रस्त आहे पण जागेवर उभं राहून मोठे शॉट खेळण्याचं तंत्र त्याच्याकडे आहे. समोर गोलंदाज कोण असेल ते बघावं लागेल. पण मोठे शॉट मारण्याच्या नादात विकेट देता कामा नये हे तेवढेच खरे.
सचिनचा सराव चांगला होता. फिटनेसही होता. स्थानिक स्पर्धां त्यानं खूपच गाजवल्या होत्या त्यामुळे गुहागर मतदारसंघातले क्रिडा रसीक खूपच खुश होते. त्यानं दुसरा एक सचिन संघात घेतला होता. गेले ६-७ वर्ष रोज चिपळूमधून गुहागराला प्रॅक्टीस जावून त्यानं संघ विजयी होईल इतका मजबूत केला होता. पण निवड समितीकडे त्याच्या अष्टपैलू खेळाबद्दल कुणी रिपोर्टींगच केलं नाही. निवडसमितीमध्ये त्याच्या खेळाचं कौतूक असणारे एक ज्येष्ठ सदस्य होते. पण सध्या त्यांचा फार प्रभाव पडत नाही. निवड समितीने केवळ संघ जिंकला पाहिजे या व्यावसायिक भूमिकेतून सचिनला डावलण्याचं काम केलं. विधानसभा 2019 च्या चषकाची फायनल मॅच २१ ऑक्टोबरला होणार आहे. तोपर्यंत संघ जिंकणार की हरणार याबद्दल विश्लेषण केलं जाणार आहे. पण शिवसेनेच्या निवड समितीने पुत्र प्रेमासाठी अनेक खेळाडुंचे बळी घ्यायचं ठरवलेलं आहे. जिल्हाप्रमुख सचिन कदम हे त्यातलं ठळक उदाहरण म्हणता येईल.