खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर भरधाव वेगातील मारूती कारने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षातील तीघेजण जखमी झाले. जखमींमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींची नावं मात्र उशिरापर्यंत कळू शकली नव्हती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून मुंबईला जाण्यासाठी निघालेली रिक्षा भोस्ते घाटातील अवघड वळणावर आली असता ठाणे येथून सावर्डे येथे जाणाऱ्या मारूती कारने रिक्षाला समोरून धडक दिली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षातील तीघेजण जखमी झाले. या रिक्षातून दोन लहान मुले प्रवास करत होती. त्यातील
एक मुलगा जखमी झाला आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.
महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान भोस्ते घाटातील अवघड वळणाचे काम अतिशय धोकादायक झाले असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. गेल्या तीन महिन्यात या एकाच ठिकाणी सुमारे सात ते आठ अपघात झाले आहे. खरतर अपघाताचे कारण हे रस्त्याची विशिष्ट परिस्थिती असल्याने संबधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र ठेकेदार किंवा अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने तीव्र उतराच्या अवघड वळणावर वारंवार अपघात होवू लागले आहेत. महामार्गावर दर दोन दिवसाआड होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी करोडो रुपये खर्च करून महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरील वळणावर वारंवार जीवघेणे अपघात होत असतील तर चौपदरीकरणापेक्षा जुन्या रस्ताच बरा होता असे म्हणावे लागत आहे.
भोस्ते घाटातील या अवघड वळणावर तात्काळ आवश्यक ती उपाययोजना केली गेली नाही तर या ठिकाणी भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही