गुहागर -विजापुर रस्ता रुंदीकरणातील काँक्रीटला देवघर दरम्यान पुन्हा तडे ; तर मोऱ्यांची बांधकामे समांतर नसल्याने वाहने आपटण्याचे प्रकार, वाहनचालक संतप्त

0
286
बातम्या शेअर करा



गुहागर – गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरण पुन्हा एकदा विविध कारणांनी चर्चेत आले आहे. मार्गताम्हाने-देवघर दरम्यान, काँक्रीट करण्यात आलेल्या रस्त्याला पुन्हा एकदा तडे गेलेले दिसून येत आहेत. त्यातच देवघर ते चिखली दरम्यान काँक्रीटच्या मोऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत त्यांची बांधकामे रस्त्याच्या काँक्रीटला समांतर नसल्याने लहान-मोठी वाहने आपटण्याचे प्रकार होत आहेत. यामध्ये वाहने व चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी ठेकेदाराविरुध्द संताप व्यक्त केला आहे.
गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरण सुरुवातीपासूनच वादाचे ठरले आहे. यामध्ये रस्त्यांची खोदाई, बाजारपेठा खाली तर रस्ते वर, जोडरस्त्यांचे झालेले नुकसान, धुळीचे साम्राज्य, जमीनदारांना मोबादला न मिळणे आदी कारणे रुंदीकरणात वादाची ठरलेली आहेत. त्यातच आता रुंदीकरण होऊनही बांधकामाबाबत अनेक समस्या उद्भवलेल्या दिसून येत आहेत. गेल्यावर्षी देवघर ते गिमवी दरम्यान, झालेल्या काँक्रीट रस्त्याला तडे गेले होते. यावेळी सर्वप्रथम . यावेळी ठेकेदाराने तडे गेलेल्या रस्त्यावर सिमेंटचा मुलामा करुन वेळ मारुन नेली होती. या मुलामाची खूण आजही दिसून येत आहे. आता मार्गताम्हाने ते देवघर या दरम्यान, काँक्रीटला तडे गेलेले दिसून येत आहेत. यावर अद्यापही कुणीही आवाज उठविलेला नाही.
रस्ता रुंदीकरण करताना सर्वप्रथम नाल्यांवरील मोऱ्यांची बांधकामे करण्यात आली. नंतर त्यांना दोनही बाजूने जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. अशावेळी रस्त्याच्या दोनही बाजूला मधल्या भागातील काँक्रीट केलेल्या मोऱ्या रस्त्यांना समांतर नसल्याने येथे वाहने हाचके देतात व आपटतात. तसेच अचानक जागेवरच वाहनांना ब्रेकही लावावा लागतो. जणूकाही येथे गतिरोधक तर नाही ना असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित होतो. दुचाकीस्वारांची हाडे तर खिळखिळीच होतात. लहान वाहनांची नटबोल्ड उडणे, पत्रा उखडणे, टायर खराब होणे असे प्रकार घडत असल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. दुचाकीस्वारांचे प्रसंगी अपघातही होतात. देवघरपासून शृंगारतळीपर्यंत अशाप्रकारच्या एकूण 6 मोऱ्या आहेत. या सर्वच ठिकाणी असे प्रकार घडून येत आहेत. रस्त्याच्या दोनही बाजूला मध्येच जोडणाऱ्या या मोऱ्या रस्त्यांना काँक्रीटने समांतर करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.
अनधिकृत बांधकामांना अभय
गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत रस्ता रुंदीकरणाला वेग आला आहे. वेळंब फाट्यावरील प्रसिध्द असलेला पूल पाडण्यात आला असून पर्यायी रस्ता नाल्यात भराव टाकून काढण्यात आलेला आहे. वेळंब फाट्यावरील सार्वजनिक स्वच्छतागृहही तोडण्यात आले असून एकमेव असलेल्या या स्वच्छतागृहाअभावी ग्राहक, नागरिक, व्यापारी यांची मोठी गैरसोय होणार आहे. रुंदीकरणात ‌अशाप्रकारची बांधकामे तोडण्यात येत असताना अनधिकृत बांधकामे वगळून त्यांना अभय देण्याचे प्रकार शृंगारतळीत दिसून येत आहेत. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here