ग्रीन रिफायनरी प्रकल्प ; गुहागर किंवा रायगडला होणार -विनायक राऊत

0
967
बातम्या शेअर करा

चिपळूण – (विशेष प्रतिनिधी)- ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. तो महाराष्ट्रातच राहील. परंतु; तो नाणारमध्ये आता होणार नाही, तर रायगड किंवा गुहागरमध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे, असे स्पष्ट प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. त्यामुळे नाणारच्या भूमीत हा प्रकल्प होणार नसल्याचे पुढे आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबत स्पष्ट भूमिका घेतली असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत चिपळूण दौऱ्यावर आले असता त्यांनी हा संवाद साधला.
यावेळी खा. राऊत यांनी नाणार प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नाणार रिफायनरी प्रकल्पास फक्त आपलाच विरोध नाही. आज जे लोक या प्रकल्पाचे समर्थन करीत आहेत त्यांनी नाणार परिसरातील प्रकल्प क्षेत्रातील 14 गावांमध्ये जाऊन लोकांची मते जाणून घ्यावीत. तेथील ऐंशी टक्के लोकांचा आजही या प्रकल्पास विरोध आहे. प्रकल्प क्षेत्राच्या बाहेरील गावातून काही लोक समर्थन करीत असले तरी ते वास्तव नाही. या बाबत आमदार राजन साळवी यांनी घेतलेली भूमिका वैयक्तिक स्वरूपाची होती. त्याला काही स्थानिक गोष्टी कारणीभूत आहेत.

नाणार प्रकल्पासाठी अनेक गुजराती लोकांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना हा प्रकल्प याच ठिकाणी व्हावा असे वाटत आहे. त्यासाठीच हा आग्रह सुरू आहे, असे स्पष्ट मत खा. राऊत यांनी व्यक्त केले. या संदर्भात केंद्रातील अधिकारी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. आपण त्यावेळी उपस्थित होतो. आपण त्यावेळी कोणतीही भूमिका मांडली नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प महाराष्ट्रातच होईल; पण नाणारला होईल हे स्पष्ट केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बागायती आहे. तेथील लोक या बागांच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत. या शिवाय पर्यटनाला वाव आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे कोकणच्या पर्यटन विकासासाठी वेगळी योजना आखत आहेत. या बाबत त्यांचा अभ्यास सुरू आहे. लवकरच हे प्रकल्प समोर येतील, असे सांगतानाच रिफायनरी रायगड लोकसभा मतदारसंघातील गुहागर अथवा रायगड जिल्ह्यात होईल. मात्र, तो राज्याच्या बाहेर जाणार नाही, असे स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी सागरी किनारा लगत असणे गरजेचे आहे. त्यामुळे तो नाणार ऐवजी अन्यत्र होईल, असा आशावाद खा. राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुका उपाध्यक्ष राजू देवळेकर, नगरपरिषदेचे बांधकाम सभापती मनोज शिंदे, आरोग्य सभापती शशिकांत मोदी, महंमद फकीर, आदी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here