खेड -१५ जानेवारी रोजी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ग्रामीण भागातील राजकारण आता चांगलच तापू लागलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आता अर्ज मागे घेण्याच्या तारखेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काही गावांमध्ये तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारावर दबाव टाकण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. त्यामुळे गावांमध्ये अंतर्गत क्लेश निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुक ही गावपातळीवर काम करणाऱ्या पुढाऱ्यांची निवडणुक. या निवडणुकीत गावातील हेवेदावे उफाळून येतात आणि गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या ग्रामस्थांमध्ये क्लेश निर्माण होतात. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुक ही अन्य निवडणुकांच्या तुलनेत क्लेशकारक समजली जाते.
खेड तालुक्यात सध्या ८७ ग्रामपंचायतीच्या ६८१ जागांसाठी निवडणुका होत आहेत. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गावपुढाऱ्यांनी मोर्चे बांधणी करायला सुरवात केली होती. सरपंच पदावर डोळा असणाऱ्यांनी तर गुडघ्याला बाशिंगच बांधले होते. कधी एकदा सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होतयं आणि कधी मोर्चेबांधणी करतो असे सरपंच पदाच्या शर्यतीत असलेल्यांना झाले होते. १५ डिसेंबर ही सरपंच आरक्षणाची तारीखही जाहीर करण्यात आली होती. मात्र शासनाने अचानक निर्णय फिरवला आणि सरपंच पदाचे आरक्षण सदस्य निवडीनंतर घेण्याचे जाहीर केले त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या २३ ते ३० डिसेंबर २०२० या मुदतीत निवडणुक कार्यालयाकडे ११९० अर्ज दाखल झाले होते. ३१ रोजी झालेल्या छाननीदरम्यान यातील ८ अर्ज वेगवेगळ्या कारणांमुळे बाद ठरविण्यात आले त्यामुळे आता ११८२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र यामध्ये काही उमेदवार हे डमी उमेदवार असल्याने ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज कोण मागे घेतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सद्यस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात ११८२ उमेदवार असले तरी अर्ज मागे घेण्यासाठी सुरु असलेल्या दबावतंत्रामुळे काहींनी आपले अर्ज मागे घेतले की निवडणुकीच्य लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. काही गावातील ग्रामस्थांनी मात्र निवडणुका न करता ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.