चिपळूण – रत्नगिरी जिल्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन ८ जुलै पर्यंत जिल्ह्यात कडक लाँकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी यांनी केली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा – महाविद्यालयासह सर्वच बंद आहे. आँपरेशन ब्रेक -द -चेन साठी जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे.
या लाँकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही जिल्ह्यातुन बाहेर व जिल्ह्यात येण्याची परवानगी नसताना शासनाचे हेच आदेश पायदळी तुडवत लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर कंपनीच्या मजुरांची एक बस थेट मध्यप्रदेश हून लोटे एमआयडीसी येथील कंपनीत दाखल झाली. ही बस ३२ कामगारांना घेऊन ही लोटे येथे आलीच कशी ? त्या कामगारांची आरोग्य तपासणीचे काय ? त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार का ? असे विविध प्रश्न विचारीत आज कंपनीच्या गेटवर लोटेतील ग्रामस्थानी धडक देऊन विचारले. त्यामुळे गडबडलेल्या कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यानी ग्रामस्थांना थातुरमातुर उत्तरे देऊन कंपनीच्या गेटवरुन काढता पाय घेतला.
लोटे औद्योगिक वसाहतीत दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे. गेल्या आठ दिवसात घराडा केमिल्कस मध्ये पंधरा पेक्षा जास्त कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहत व नजीकची गावे भितीच्या छायेखाली आहेत. असे असताना पुष्कर कंपनीच्या मालकांनी बाहेरी राज्यातील कर्मचारी कोणाच्या आदेशनी या ठिकाणी आणलेत असे प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा. तसेच कोणतीही परवानगी नसताना आलेल्या त्या ३२ मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना २८ दिवस क्वारंटाईन करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.