दोणवली मध्ये पाणी योजनेसाठीचा निधी पाण्यात ? काम न करता ठेकेदाराला २ लाख ; चौकशी करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक

0
225
बातम्या शेअर करा

चिपळूण – (विशेष प्रतिनिधी ) – आजपर्यंत आपण सिनेमात पाहिले की विहिर चोरीला गेली मात्र असाच काहीसा प्रकार चिपळूण तालुक्यातील दोणवली या गावात घडला आहे. या गावामध्ये झऱ्यांद्वारे पाणी येत असल्याने ते पाणी ग्रॅव्हीटीद्वारे आणण्यासाठी शासनाने या योजनेला मंजुरी दिली. या योजनेमध्ये शासनाकडून काही रक्कमही जमा झाली होती. या योजनेतील कोणत्याही कामाची सुरूवात न करता ठेकेदाराला ग्रामपाणीपुरवठा कमिटीने चक्क दोन लाख रूपयांचा निधी अदा केला. काम न करता २ लाख दिल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले व शासनाकडून काम थांबविण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र या पाणी योजनेसाठी शासनाने दिलेला निधी पाण्यात गेल्याचे येथील ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

चिपळूण तालुक्यातील खाडी किनारी जवळपास दोन हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेले हे दोणवली गाव उन्हाळ्याच्या दिवसात गावात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते. मात्र या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गावातीलच एका जुन्या झऱ्याचे जे पाणी २४ तास वाहत आहे. त्या पाण्याचा उपयोग करून संपूर्ण गावाला पाणी मिळावा, या हेतूने शासनाने २०१२ मध्ये ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव केला. तत्कालीन सरपंच यांनी याठिकाणी योजना मंजूर होण्यासाठी पाठपुरावा केला आणि त्यासाठी तब्बल दहा लाख रूपये मंजूर करून घेतले. त्यासाठी हे काम स्थानिक पातळीवर एका ठेकेदाराला देण्यात आले मात्र अनेक अडचणी समोर येत असल्याने हे काम सूरू होण्यास उशीर झाला. त्यातच सहा महिने निघून गेले आणि एक दिवशी ग्रामपंचायतच्या ग्राम पाणी पुरवठा कमिटीने ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून  काम करणाऱ्या ठेकेदाराला दोन लाख रूपयांचा चेक अदा केला. ज्यावेळेला ग्रामस्थांमध्ये याबाबत चर्चा झाली त्यावेळी या योजनेचे कोणतेही काम पुर्ण झालेले नाहीये, कुठे साधा खड्डासुध्दा मारलेला नाही. अशा ठेकेदाराला आपण दोन लाख रूपये कसे दिले याची चर्चा होऊ लागली आणि त्यावेळेला हे प्रकरण उघडकीस आले.

जाफर कवारे – माजीसरपंच दोणवली गावातील एका डोंगरावर बारमाही झऱ्याद्वारे पाणी वाहते या पाण्यावर गेली चाळीस वर्षांपासून याच गावातील चार वाड्या ह्या वर्षांचे बारा महिने बिनदिक्कत पाणी मिळवतात. या चार वाडीतील ग्रामस्थांनी आपल्या स्वखर्चांने शासनाची कोणतीही मदत न घेता या डोंगरावरचे २४ तास वाहणारे झऱ्याचे पाणी आपल्या वाडीत आणले आणि आजपर्यंत त्या पाण्याचा उपयोग घेतात मग जर या चार वाड्‌या संपूर्ण बारमाही पाणी घेतात तर आपणही त्याच झऱ्याचे पाणी संपूर्ण गावाला द्यावं यासाठी हा प्रस्ताव पाठवून शासनाकडून या योजनेसाठी दहा लाख रूपये मंजूर केल्याचे तात्कालीन सरपंच सांगतात.

 अशोक निकम ग्रामस्थ – याच झऱ्यावर आमच्या आजोबांनी व वडिलांनी चाळीस ते पन्नास वर्षापासून एका पाठाद्वारे पाणी आणलं होत. मात्र कालांतराने या पाटात कचरा होत असल्याने आम्ही चार वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन ते झऱ्याचे पाणी एकत्र आणत चार पाईपद्वारे चार वाड्यांमध्ये आणले. गेली ४० ते ५० वर्ष हे पाणी आम्ही वापरतो आणि या पाण्यावर आपली तहान भागवत आहोत. मात्र सध्या गावातीलच काही लोक आमची ४० ते ५० वर्षांपूर्वींची योजना आहे त्या योजनेला आम्ही २०१५ साली शासनाचा निधी देऊन सुरू केली आहे असे दाखवून या योजनेवर पैसे लाटल्याचा प्रकार आमच्या ग्रामस्थांच्या कानी येत आहे. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मात्र आम्ही त्याला विरोध करताच गावच्या ग्रामसभेमध्ये संबंधित ठेकेदाराला या गावी योजनेचे कोणतेही काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे आपल्याला दिलेले दोन लाख रूपये परत करण्याचे पत्र ग्रामपंचायतीने पाठवले असल्याचे सांगितले.

आर. डी. यादवग्रामीणपाणीपुरवठाअधिकारीचिपळूण – दोणवली गावातील झऱ्याद्वारे वाहणारे पाणी ग्रामस्थांना मिळावे या हेतूने शासनाने २०१५ मध्ये दहा लाख रूपयाचा निधी मंजूर केला त्यातील ५ लाख रूपये निधी जिल्हा परिषदेमार्फत गावातील ग्राम पाणी पुरवठा कमिटी यांच्या खात्यामध्ये वर्ग केले आहे. त्यामुळे त्या पैशाचे नक्की काय झाले याबाबत आम्हाला सांगता येणार नाही. मात्र आम्हाला त्या कामाची काम सुरूवात झाली आहे, त्याबाबत काही फोटो दाखवत दोन लाख रूपये ठेकेदाराला दिले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. मात्र कालांतराने योजना पुर्ण होत नसल्याने सध्या शासनाने ही योजना थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

एकीकडे शासन गावातील भीषण पाणीटंचाई दूर करण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत मात्र गावातीलच काही राजकारणी आणि काही पुढारी एकत्र येऊन अशाप्रकारे शासनाचा पैसा लाटण्याचा उद्योग करत आहेत. तर या प्रकरणात गावातील जुने – जाणते लोक ही योजना आम्ही स्वखर्चाने सुरू केले असे सांगतात. तर त्याचवेळी याच गावातील तात्कालिन ग्राम पाणी पुरवठाचे समिती अध्यक्ष व सदस्य ही योजना ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून आलेल्या निधीद्वारे आम्ही सूरू केली असे ग्रामस्थांना  सांगतात. तर एकीकडे मात्र शासकीय अधिकारी ती योजना अपूर्ण होती आणि अपूर्ण योजना शासनाने आम्हाला बंद करायला सांगितली असे सांगतात. मात्र हे सर्व जण जरी वेगवेगळे सांगत असतील तरी एक मात्र नक्की की ही योजना पूर्ण होण्याआधी या योजनेचे दोन लाख रूपये ग्रामपंचायत ग्राम पाणी पुरवठा कमिटीने अदा केल्याचे नोंद ग्रामपंचायत मध्ये आहे. ज्यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ग्राम पाणी पुरवठा समितीवर दबाव आणला त्यावेळी या समितीने पुन्हा एकदा या ठेकेदाराला हे दोन लाख रूपये नजर चुकीने आम्ही तुम्हाला दिलेत ते वापस करा असा पत्रव्यवहार सुध्दा केला आहे. त्यामुळे नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड हे मात्र तेवढेच खरे. तरी याबाबत सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करतात.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here