मुंबई- राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नामनिर्देशनपत्रे ३० डिसेंबरपर्यंत या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल.