चिपळूण – सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिपळूण येथील सांस्कृतिक केंद्र गेली पंधरा वर्षे बंद आहे. काही महिन्यांपूर्वी या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले आहे, मात्र उद्घाटनाअभावी अद्यापही ते नाट्यरसिकांच्या सेवेत रुजू झालेले नाही.
आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चिपळूणमधील नाट्यकर्मीनी या बंद नाट्यगृहाचे लोकार्पण केले. या सोहळ्याला अभिनेता ओंकार भोजने, अभिनेत्री गौरी फणसे, अभिनेत्री ऐश्वर्या नागेश यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच बंद नाट्यगृहाचे अशाप्रकारे उद्घाटन झाल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर झालेल्या या लोकार्पण सोहळ्यानिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवाळी पहाटची कथ्थक नृत्यांगना स्कंधा चितळे हिच्या ‘गणेश वंदना’ने सुरुवात झाली.
मंगेश डोंगरे यांनी वासुदेव साकारला. यानंतर चिपळूणमधील कलाकारांच्या गायनाचा कार्यक्रम रंगला. यामध्ये निरंजन केतकर, मंजिरी शेंडे, आशुतोष मोडक, आर्या पोटे यांनी विविध गीते सादर करून मैफिलीमध्ये रंगत आणली. दिवाळी पहाट मैफिलीचे निवेदन मीरा पोतदार यांनी केले. वैभव नाखरे यांनी तबला तर हार्मोनियम साथ सौमित्र देवस्थळी यांनी साथ दिली. रंगकर्मी संतोष केतकर, भाऊ कार्ले, दिलीप आंब्रे, योगेश बांडागळे, सतीश कदम, नाट्यसंयोजक सुनील जोशी आदी मंडळी उपस्थित होती.