चिपळूण – मुंबई -गोवा या महामार्गावरील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाच्या तक्रारी वाढत चालल्या असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने 33 उद्योगांना नोटीस बजावल्या आहेत. यातील सात उद्योगांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून एक कारखाना बंद करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
पावसाळय़ात दाभोळ खाडीत मासे मरण्याच्या घटना वारंवार घडल्यानंतर संघर्ष समितीकडून तक्रारी करण्यात आल्या. मात्र या तक्रारींचा फारसा उपयोग झालेला नाही. त्यातच खुद्द लोटे वसाहतीमधूनच वाहणाऱ्या नाल्यांमध्ये बेधडकपणे उद्योगांचे सांडपाणी सोडले जाण्याचे प्रकारही अलिकडच्या काळात वाढू लागले आहेत. सांडपाणी पाण्यात सोडल्यानंतर ते पावसाच्या पाण्याबरोबर व जलस्त्रोत प्रदूषित होत असल्याचा आरोप केला जात आह. मध्यंतरी शिवालिक कंपनीजवळ संघर्ष समिती, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि खेड मधून आलेल्या महसूलच्या भरारी पथकांच्या उपस्थितीत सदरचा प्रकार उघडीस आल्यानंतर पंचनामा करण्यात आला. दरम्यान, प्रदूषणच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपली कारवाई सुरू केली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योगांना नोटीस देते. मात्र पुढे म्हणावी तशी अपेक्षित कारवाई होताना दिसत नाही. यापूर्वीही मुंबईतून आलेल्या पथकांमार्फत उद्योगांची तपासणी करण्यात आली. नोटीस धाडून बंदची कारवाईही झाली. मात्र पुढे हेच उद्योग पुन्हा लगेचच सुरू झाले. त्यामुळे मंडळाच्या नोटीस नेमक्या कशासाठी असतात असा प्रश्न निर्माण होताना दिसतो.