चिपळूण – महाड येथील इमारत दुर्घटने नंतर जाग आलेल्या प्रशासनाने चिपळूण शहरातील ४९३ बहुमजली इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल पंधरा दिवसात पालिकेत देण्याची नोटीस मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी बजावली आहे.
नगरपालिकेच्या परवानाधारक स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून हे ऑडिट करून अहवाल पालिका प्रशासनाकडे पाठवावा, असे नमूद करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी महाड येथे झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर शासनाने सर्व बहुमजली इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या सूचनेनुसार चिपळूण शहरातील बहुमजली इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. रवींद्र पाटील, हसन परकर, धुदप्पा कंगणवाडी, मंदार सोमण, रईद भाटकर, मिलिंद जाधव, पराग कांबळे, सचिन मेश्राम, रवींद्र करंदीकर या परवानाधारक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगकडून हे ऑडिट करून घ्यावयाचे आहे.