शुंगारतळी- कोरोनाच्या या काळात यशस्वीपणे कामगिरी बजावणारे गुहागर तालुक्यातील सर्वात मोठ्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच व सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांची नुकतीच विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली आहे. कोवीड योध्दाचा हा एकप्रकारे सन्मान असून त्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळीत सापडला होता. त्यावेळेपासूनच शृंगारतळी संवेदनशील बनली होती ती आजतागायत. याच भागाचे सरपंच व अहोरात्र नागरिकांच्या सेवेसाठी झगडणारे कार्यतत्पर संजय पवार कोरोना आपत्तीतून दोन महिन्यांपूर्वी बालंबाल बजावले होते. पाटपन्हाळे गावाला संजय पवार यांच्यासारखा कार्यतत्पर तरुण सरपंच लाभाला आहे. थेट लोकांमधून निवडून आलेल्या व लोकांची सेवा करण्याची संधी मिळविलेल्या पवार यांनी गावात बरीच विकासकामे केलेली आहेत. अनेक योजना राबविलेल्या आहेत.
मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आपल्या शृंगारतळी कार्यक्षेत्रात आढळल्याचे त्यांना जिल्हा प्रशासनाकडून समजले त्यावेळी त्यांची झोपच उडाली होती. त्यांनी त्याच दिवशी मध्यरात्री दीड वाजता तातडीने बैठक घेऊन यावर सविस्तर चर्चा घडवून आणून गावात उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली होती ती आजतागायत. शासकीय यंत्रणेलाही त्यांनी चांगली साथ दिली. यामुळे त्यांच्या कामगिरीचे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले होते.
कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादूर्भावात गेले सहा महिने सरपंच पवार आपल्या गावात उपाययोजनांवर भर देत आहेत. सर्वांना बरोबर घेऊन गावात जनजागूती करीत आहेत. ते गुहागर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष असून काही महिन्यांपूर्वी त्यांनी तालुक्याच्या सर्व सरपंचांची बैठक घेऊन आपआपल्या गावांमध्ये कशा उपायोजना राबविता येतील व रखडलेल्या विकासकामांवर चर्चा घडवून आणली होती. एवढेच नव्हे तर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ते आजपर्यंत धावपळच करीत आहेत. कोरोनासारख्या आपत्तीतून संजय पवार वाचले असले तरी त्यांनी सामाजिक कार्याची आस सोडलेली नाही. अशा या कोवीड योध्दाचा विशेष कार्यकारी अधिकारी पदाने झालेला हा सन्मान वाखाणण्यासारखा आहे.